Devendra Fadnavis On PM Narendra Modi: मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली. मोदींच्या माफीनंतर विरोधक राज्य सरकारच्या माफीची व मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधकांना या घटनेत फक्त राजकारण दिसत आहे. त्याना राजकारणाशिवाय दुसरे काही दिसत नाही. शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व छत्रपती शिवाजी महाराजाच्या अनुयायींची जाहीर माफी मागितली. पण विरोधक यावर राजकारण करता आहेत.
'छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहेत. मी आज शिवाजी महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून माफी मागतो. आमच्यावर वेगळे संस्कार झाले आहेत. काही लोक सातत्याने भारताचे महान सपुत्र वीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्ध वापरत आहेत. आम्ही वीर सावरकरांना अपमानित करणारे लोक नाहीत. ते सावरकरांचा अपमान करूनही माफी मागत नाही. कोर्टात जातात, पण तरीही त्यांना पश्चाताप होत नाही. हे त्यांचे संस्कार आहेत', असे बोलत मोदींनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले. पुढे मोदी म्हणाले की, 'मी येथे आल्यावर शिवाजी महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून माफी मागत आहे. जे लोक शिवाजी महाराजांना अराध्य दैवत मानतात, त्यांच्या काळजाला ठेच लागली आहे, अशा आराध्य दैवत्याची पूजा करणाऱ्यांची मी माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहे. आमच्यासाठी अराध्य दैवतापेक्षा काहीच मोठे नाही', असेही मोदी म्हणाले.
राजकोट किल्ल्यावर शिवाजी पुतळा उभारण्यापूर्वी योग्य त्या परवानग्या घेण्यात आल्या नव्हत्या आणि सरकार आता या घटनेसाठी भारतीय नौदलाला जबाबदार धरत आहे. हा पुतळा निवडणुकीसाठी घाईघाईने तयार करण्यात आला होता. हा पुतळा पंतप्रधानांच्या प्रचारासाठी तयार करण्यात आला होता. या संपूर्ण प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला. परवानग्या घेण्यात आल्या नाहीत. स्वत:ला दोषमुक्त करून भारतीय नौदलाला दोष देण्यासाठी खोटे बोलले जात होते. ही माफी म्हणजे राजकीय हताशपणाची आणखी एक कृती आहे,' असे ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.
'छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडल्याबद्दल केवळ माफी मागणे पुरेसे ठरणार नाही, कारण या घटनेमुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसला आहे', अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना केली. 'भारतीय जनता पक्षाने सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे आणि केवळ मतांसाठी त्यांच्या नावाचा वापर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीतील भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राला लाज वाटली, तरी अत्यंत भ्रष्ट भाजप सरकारला कोणताही पश्चाताप झाला नाही', असेही नाना पटोले म्हणाले.