राज्यासह देशभरातील लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे दर्शन गेल्या ११ दिवसात लाखो लोकांनी घेतलं. आज लालबागच्या राजा विसर्जनासाठी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मंडपातून बाहेर पडला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत व तसेच गुलाल,पुष्पवृष्टी तसेच जयघोषात राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. मंगळवारी पहाटे पासूनच एकीकडे लालबागच्या राजाच्या निरोपाची तयारी सुरु असतानाच अचानक बाप्पाच्या पायावर सापडलेल्या एका चिठ्ठीने लालबाग आणि आजूबाजूच्या परिसरात राजकीय चर्चांना उधाण आलं.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून ऐन गणेशोत्सवातही अनेक राजकीय नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बैठकांचा सपाटा लावल्याचे दिसून आले. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे मुंबईत गणेश विसर्जनाची धामधूमसुरू असतानाच बाप्पाच्या चरणी वाहिलेल्या या चिठ्ठीने पुन्हा राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. असे काय आहे या चिठ्ठीत..
विसर्जनाच्या दिवशीच लालबागचा राजाच्या चरणी वाहिलेल्या चिठ्ठीत विधानसभेसाठी आणखी एका इच्छुक उमेदवाराचं नाव समोर आलं आहे. सुधीर साळवी २०२४ ला आमदार होउ दे...अशा आशयाची चिठ्ठी साळवी समर्थकांकडून लालबागच्या राजाच्या चरणी वाहण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून २०२४ चा शिवडी विधानसभा आमदार सुधीरभाऊ साळवी असे चिठ्ठीमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.
लालबागच्या राजाच्या चरणाशी आपल्या मनातील इच्छा लिहून ठेवली तर ती पूर्ण होते, असा भक्तांची श्रद्धा आहे. त्यानुसारच ही राजकीय इच्छा राजाच्या पायाशी आली आहे. मात्र यामुळे स्थानिक राजकारणामध्ये चर्चांना उधाण आलं आहे. लालबागचा राजा ज्या मतदारसंघात येतो त्या शिवडी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचेअजय चौधरी आमदार आहेत. यावेळीही शिवडीत ठाकरे गटाकडून अजय चौधरी हे मोठे दावेदार आहेत. शिवसेना फुटल्यानंतरही चौधरी ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहिले होते.
मात्र आगामी विधानसभेसाठी विद्यमान आमदार अजय चौधरींबरोबरच ठाकरे गटाकडून सुधीर साळवी देखील शिवडीतून लढण्यासाठी इच्छुक आहेत. सुधीर साळवी हे लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाचे सचिव असल्याने या भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी सहकुटूंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं, तेव्हा सुधीर साळवीही त्यांच्यासोबत उपस्थित होते. त्यामुळेच यंदा शिवडीच्या जागेसाठी जोरदार रस्सीखेच होण्याची चिन्हे दिसत आहेत.