Sanjay Raut News: मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याची घोषणा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. आघाडीत कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळत नाही, त्याचा फटका पक्षाला बसतो. मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावयचे आहे. उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील संकेत दिले आहेत, असेही संजय राऊत म्हणाले. ठाकरे गटाच्या या घोषणेमुळे महाविकास आघाडीत फूट पडली आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना ठाकरे गट महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली. ते म्हणाले की, ‘मुंबईपासून ते नागपूरपर्यंत सर्व महापालिकेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार आहोत.आम्हाला उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील संकेत दिलेले आहेत. आमचा असा निर्णय होत आहे की मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर असेल. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? कारण आघाडीत आणि विधानसभेत कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला आणि पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपंचायतीमध्ये निवडणुका स्वबळावर लढून आपआपले पक्ष मजबूत करावे लागतात.’
पंतप्रधान नरेंद् मोदी यांनी आपल्या पहिल्या पॉडकास्टमध्ये मी सामान्य माणूस आहे, देव नाही, माझ्याकडूनही चुका होतात, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'मोदी हे देव आहेत. मी त्यांना माणूस मानत नाही. देव तर देवच असतात. जर कोणी स्वत:ला अवतारी घोषित केले तर तो माणूस कसा होऊ शकतो? ते विष्णूचा तेरावा अवतार आहे. ज्याला देव मानले जाते, तो माणूस आहे असे म्हणत असेल तर काहीतरी गडबड आहे. यात केमिकल लोचा आहे', असा टोला त्यांनी लगावला आहे. संजय राऊतांनी केलेल्या या वक्तव्यावर भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची मुदत ७ मार्च २०२२ रोजी संपली. महापालिकेची मुदत संपून तब्बल अडीच वर्षे झाली आहेत. मुंबई महापालिकेवर प्रशासकाची राजवट सुरू आहे. या महानगरपालिकेचे दोन अर्थसंकल्प आतापर्यंत प्रशासकांनी सादर केले. मात्र, विधानसभेला घवघवीत यश मिळाल्यामुळे आता संधी साधून महायुती लवकरात लवकर निवडणूक घेईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.