मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या...; अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या...; अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 09, 2024 08:08 AM IST

Aaditya Thackeray On Abhishek Ghosalkar Shot Died: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी आदित्य ठाकरेंनी ट्विट केले आहे.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray (Sandip Mahankal)

Abhishek Ghosalkar Shot Died In Mumbai: मुंबईच्या दहिसर परिसरातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार यांनी या घटनेवरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी महाराष्ट्राने कधीच अशी अराजकता पाहिली नव्हती. कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडताना पाहणे धक्कादायक आणि सुन्न करणारे आहे, असे आदित्य ठाकरेंनी ट्विट केले आहे.

अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "अभिषेक घोसाळकर ह्यांची निर्दयीपणे झालेली हत्या धक्कादायक आणि चीड आणणारी आहे. शिवसेनेचे नगरसेवक आणि कडवट शिवसैनिक म्हणून त्यांनी केलेले कार्य विसरता येणार नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! घोसाळकर कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. देव त्यांना ह्या प्रचंड दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो", अशी त्यांनी प्रार्थना केली आहे.

पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्राने यापू्र्वी कधीच अशी अराजकता पाहिली नव्हती. कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडताना पाहणे धक्कादायक आणि सुन्न करणारे आहे. सामान्य माणसाच्या रक्षणासाठी यंत्रणा अस्तित्वात तरी आहे का? कायद्याचा धाक उरलाय का? प्रशासन आणि व्यवस्था संपूर्णपणे ढासळली आहे, हे भीषण आहे.”

नेमके प्रकरण काय?

मॉरिस नोरोन्हा असे अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. मॉरिस हा स्वंयघोषित नेता असून त्याने एका कार्यक्रमासाठी अभिषेक घोसाळकर यांना कार्यालयात बोलावून घेतले होते. त्यानंतर अभिषेक घोसाळकर फेसबूक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना मॉरिसने त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अभिषेक घोसाळकर यांना तातडीने जवळच्याच करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केल्यानंतर मॉरिस यानेही स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

WhatsApp channel