Maharashtra Politics : बीडमधील गुन्हेगारीच्या विरोधात अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या इशाऱ्याची ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. ‘अजित पवार हे स्वत: आर्थिक घोटाळ्यातील गुन्हेगार आहेत. ते इतरांवर काय कारवाई करणार? त्यामुळं याला सोडणार नाही, त्याला सोडणार नाही हे त्यांनी बोलूच नये,’ अशा शब्दांत संजय राऊत यांनी सुनावलं.
अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वत:कडं ठेवल्यानंतर सध्या ते बीडमध्ये आहेत. काल त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बेकायदा व गुन्हेगारी कृत्यांपासून लांब राहण्याचा दम भरला. तसंच, कोणी तसं आढळल्यास सोडणार नाही असा इशाराही दिला.
खासदार संजय राऊत यांनी आज त्यावर भाष्य केलं. 'अजित पवार हे काही तटस्थ वृत्तीचे नेते नाहीत. निष्पक्षपणे नेत्यांनी काम करायचं असतं त्यातले ते नाहीत. धनंजय मुंडेही तसे न्यायबुद्धीनं काम करणारे नाहीत. बीडमध्ये जे चाललंय ते एकमेकांचा हात धरूनच घडतंय. अजित पवारांनी एखाद्या तटस्थ माणसाकडं बीडचं पालकमंत्रिपद द्यायला हवं, पण तसा नेता राज्यात सध्या तरी नाही, असं राऊत म्हणाले.
'अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराच्या प्रकरणात भाजपकडूनच काही कारवाया झाल्या आहेत. मकोका लागला नाही एवढंच. अनेक आर्थिक गुन्हे अजित पवार, प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांच्या विरोधात दाखल झालेले होते. यातून सुटण्यासाठी त्यांनी भाजपसोबत जाऊन गंगास्नान केलं आहे. त्यांनी कायदेशीर कारवाईच्या गप्पा मारू नये. ते स्वत:च सुटलेले आहेत. अजित पवार, फडणवीस, शिंदे हे सगळे पोकळ दम देतात, असा संताप राऊत यांनी केला.
‘संतोष देशमुख यांचे खरे आरोपी आजही बाहेर आहेत. वाल्मिक कराडला लवकरच बाहेर काढलं जाईल. सामाजिक कार्यकर्तेही तोपर्यंत शांत झालेले असतील. त्याला राजकारणात आणलं जाईल. मराठी विरुद्ध ओबीसी संघर्षात देवेंद्र फडणवीस हे कराडला प्यादं म्हणून वापरतील. राज्यात सध्या असंच घडतंय. खून पडूनही सामाजिक समतोल बिघडवणारं राजकारण केलं जातंय. ज्यांच्यावर खून, खंडणी, बलात्काराचे आरोप आहेत, त्यांना वापरलं जातंय,’ असा दावा संजय राऊत यांनी केला.
संबंधित बातम्या