असुरांचा संहार कराया मशाल हाती दे… ठाकरेंच्या शिवसेनेचं नवं प्रचारगीत आलं! ऐका!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  असुरांचा संहार कराया मशाल हाती दे… ठाकरेंच्या शिवसेनेचं नवं प्रचारगीत आलं! ऐका!

असुरांचा संहार कराया मशाल हाती दे… ठाकरेंच्या शिवसेनेचं नवं प्रचारगीत आलं! ऐका!

Published Oct 03, 2024 02:11 PM IST

Uddhav Thackeray releases Mashal Geet : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाच्या वतीनं एक प्रचारगीत रिलीज केलं.

असुरांचा संहार कराया मशाल हाती दे… ठाकरेंच्या शिवसेनेचं नवं प्रचारगीत आलं!
असुरांचा संहार कराया मशाल हाती दे… ठाकरेंच्या शिवसेनेचं नवं प्रचारगीत आलं!

Shiv Sena UBT Prachar Geet : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं आगामी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी केली असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर आज पक्षाच्या मशाल चिन्हाचा उल्लेख असलेलं नवं प्रचारगीत रिलीज करण्यात आलं. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी हा सोहळा झाला. 'पारंपरिक गोंधळ प्रकारातलं हे गीत असून या माध्यमातून आई जगदंबेला आम्ही साकडं घालत आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं

ज्येष्ठ लेखक, गीतकार श्रीरंग गोडबोले यांनी हे गीत लिहिलं असून राहुल रानडे यांनी संगीत दिलं आहे. नंदेश उमप यांनी आपल्या पहाडी आवाजात हे गीत गायलं आहे. उद्धव ठाकरे यांनी या तिघांचंही कौतुक केलं व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे गीत पोहोचवण्याचं आवाहन जनतेला केलं.

राज्यात सध्या तोतयेगिरी सुरू आहे!

‘राज्यात सध्या तोतयेगिरी सुरू आहे. महिलांवर अत्याचार होतायत. कुणी त्राता उरलेला नाही. असंच अराजक एकेकाळी महाराष्ट्रात माजलं होतं. तेव्हा संत एकनाथांनी ‘बये दार उघड’ अशी हाक दिली होती. तेव्हा आई भवानी धावून आली. आताही आम्ही अराजक नष्ट करण्यासाठी हे अराजकीय गीत तयार केलं आहे. देवीच्या आणि जनतेच्या चरणी आम्ही हे गीत सादर करत आहोत. मनापासून आई जगदंबेला हाक मारल्यानंतर ती धावून येते हे इतिहासात दिसलंय. आताही ते दिसेल ही मला खात्री आहे, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

न्यायासाठी जगदंबेला साकडं घालतोय!

'गेली दोन-अडीच वर्षे आम्ही न्याय मंदिराची दारं ठोठावतोय. आता हात दुखायला लागलेत. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, पण न्याय मिळत नाहीए. त्यामुळं मग शेवटी आम्ही जगदंबेलाच साकडं घालायचं ठरवलंय. जनतेच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी जातोय. ही लढाई आता जनतेच्या दरबारात सुरू झाली आहे, असं उद्ध ठाकरे म्हणाले.

काय आहेत गीताचे बोल?

सत्वर भुवरी ये गं अंबे

सत्वर भुवरी ये…

असुरांचा संहार कराया

मशाल हाती दे…

आदिमाये तू ये…

आदिशक्ती तू ये…

पेटू दे शिवसेनेची मशाल

शिवसेनत उभी फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगानं ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मशाल हे निवडणूक चिन्ह दिलं होतं. लोकसभा निवडणूक पक्षानं याच चिन्हावर लढवली होती. हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून लोकसभा निवडणुकीच्या आधीही पक्षानं 'पेटू दे शिवसेनेची मशाल' हे गीत काढलं होतं. त्यातील जय भवानी, जय शिवाजी… या घोषणेवरून वादही झाला होता. आता पुन्हा एकदा ठाकरेंनी गीताच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चालवला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या