Adani Electricity News : धारावी प्रकल्पाला होत असलेला विरोध, अदानी समूहावर झालेले आरोप, संसदेत विरोधकांकडून होत असलेली जेपीसी (JPC) चौकशीच्या मागणीमुळं अडचणीत असलेल्या अदानींना होणाऱ्या विरोधाची धार तीव्र झाली आहे. ठाकरेंची शिवसेना आता स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून अदानींच्या विरोधात उतरली आहे. स्मार्ट मीटर बसविण्यास आणि पाच हजार रुपयांपेक्षा अधिक बिलासाठी रोख रक्कम न स्वीकारण्याच्या कंपनीच्या निर्णयाला शिवसेनेनं (उबाठा) विरोध केला आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळानं गुरुवारी मुंबई उपनगरांना वीजपुरवठा करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडच्या (एईएमएल) अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसंच, आपल्या मागण्या मांडल्या. स्मार्ट मीटरला असलेल्या विरोधाचं कारण शिष्टमंडळानं कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. त्यावर सर्व तक्रारींचं निराकरण झाल्यानंतरच स्मार्ट मीटरची अंमलबजावणी केली जाईल, असं आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिलं.
अनिल परब यांच्यासमवेत आमदार सुनील प्रभू आणि माजी आमदार विलास पोतनीस उपस्थित होते. एईएमएल कार्यालयात कार्यकर्त्यांनी वाढीव वीज दराविरोधात घोषणाबाजी केली असता परब व प्रभू यांनी महापालिकेची परवानगी नसलेली शहरातील वीज वितरण कंपनीची अनेक कामं बंद करा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अधिकाऱ्यांना दिला.
स्मार्ट मीटरमुळं छोट्या ग्राहकांवर अधिक बोजा पडेल, असा दावा शिवसेनेनं केला. अदानी वीज कार्यालयामार्फत स्मार्ट मीटरचं नियंत्रण करता येणार असल्यामुळं मीटर बसवल्यानंतर बिलांवरून वाद झाल्यास वीजपुरवठा खंडित करण्यासाठी किंवा पूर्ववत करण्यासाठी लाइनमनची गरज भासणार नाही. छोट्या ग्राहकांनी एक दिवसही पैसे भरण्यास उशीर केल्यास त्यांना वीजकपातीला सामोरं जावं लागेल, अशी भीती परब यांनी व्यक्त केली.
शिष्टमंडळाच्या तक्रारी ऐकून अदानी इलेक्ट्रिसिटीच्या अधिकाऱ्यांनी अनिल परब यांना आश्वासनांचं एक पत्र दिलं. शिवसेनेच्या सर्व आक्षेपांचं निराकरण झाल्यानंतरच मीटर बसविण्याचं काम सुरू केलं जाईल, अशी ग्वाही कंपनीनं दिली आहे.
स्मार्ट मीटर बसविण्याबाबत नागरिकांच्या आक्षेपांवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं सुनावणी घ्यावी, अशी मागणीही परब यांनी केली आहे.