Maharashtra Assembly Elections 2024 : निवडणूक प्रचाराच्या प्रत्येक सभेत महाराष्ट्राची सत्ता हातात द्या असं आवाहन करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना संजय राऊत यांनी बोचरा टोला हाणला आहे. ‘राज ठाकरे यांना सत्ता कशाला हवी? ते आजही सत्तेतच आहेत. भाजपसोबतच आहेत,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे यांचा पक्ष विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवत आहेत. महाराष्ट्रातील अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी उमेदवार उभे केले आहेत. आपल्या भाषणांमध्ये ते सत्ताधाऱ्यांवर फारसं न बोलता, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाविकास आघाडीला लक्ष्य करत असल्याचं दिसत आहे.
आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात झालेल्या सभेतही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्याचा आरोप करताना माझ्या हातात सत्ता आल्यास मशिदीवरील भोंगे ४८ तासांत उतरवू, असा आश्वासन त्यांनी दिलं. त्याबाबत मीडियानं प्रतिक्रिया विचारली असता संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली.
‘हा भोंगा गेली २०-२५ वर्षे आम्ही ऐकतोय, असा चिमटा राऊत यांनी राज ठाकरेंना काढला. ‘खरंतर कामं करण्यासाठी किंवा आपले कार्यक्रम राबवण्यासाठी सत्तेची गरज नसते. शिवसेना गेली ५०-५५ वर्षे सत्ता नसताना आपले कार्यक्रम राबवत आली आहे. राज ठाकरेंना सत्ता कशासाठी हवी आहे? ते आजही सत्तेबरोबरच आहेत. ते मोदी-शहांबरोबर आहेत, म्हणजे सत्तेबरोबरच आहेत. ते देवेंद्र फडणवीसांबरोबर आहेत, म्हणजे सत्तेबरोबरच आहेत. त्यांना आणखी सत्ता कशाला हवी,’ असा प्रश्न राऊत यांनी केला.
‘माझ्या हाती सत्ता आली तर मुंबई २४ तासांत साफ करेन,’ असं वरळीतील सभेत राज ठाकरे परप्रांतीयांबद्दल बोलताना म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला. 'म्हणजे नेमकी कशी साफ करणार? बोलायला सोपं असतं. सगळ्यात आधी राज ठाकरेंनी मोदी-शहा, अदानी यांना साफ करायला पाहिजे. तेच परप्रांतीय आहेत. या परप्रांतीयांनी मुंबई नासवलीय आणि मुंबई मराठी माणसाच्या हातातून काढून घ्यायचं षडयंत्र त्यांनी रचलेलं आहे. दुर्दैवानं राज ठाकरे हे त्यांना मदत करत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.