Maharashtra assembly Elections 2024 : ‘राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावर टीका करावी अशीच भाजपची इच्छा आहे. त्यांच्या भाषणाच्या स्क्रिप्ट गुजरातहून येतात. त्यांच्या बोलण्याला महाराष्ट्रात किंमत नाही’, अशी जळजळीत टीका खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर केली आहे.
राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. मात्र, आपल्या सभांतून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याऐवजी राज ठाकरे उद्धव ठाकरे व शरद पवार यांना लक्ष्य करत आहेत. याकडं लक्ष वेधलं असता संजय राऊत यांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला.
'राज ठाकरे हे काय म्हणतात याला महाराष्ट्रात काही किंमत नाही. ते दुसरे मोरारजी देसाई आहेत. राज ठाकरेंना गुजरात आणि महाराष्ट्राचं नेतृत्व एकाच वेळी करायचं आहे. त्यांच्या पक्षाला राज्यात फारसं स्थान नाही. महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेबद्दल राज ठाकरेंच्या मनात काय आहे याबद्दल नेहमीच संशय राहिला आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी व अस्मितेसाठी लढत आहेत. हे दोन्ही पक्ष आणि दोन्ही नेते संघर्ष करत आहेत. तो संघर्ष स्वार्थासाठी नाही. महाराष्ट्र लुटणाऱ्याच्या गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांच्या विरोधात हा संघर्ष आहे, असं राऊत म्हणाले.
'स्वत:च्या स्वार्थासाठी दोन गुजराती व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रातील दोन पक्ष फोडले. त्यांच्या बाजूनं हे महाशय (राज ठाकरे) उभे आहेत. आम्हाला हे पाहून मोरारजी देसाईंची आठवण झाली. राज ठाकरे खूप महान आहेत. त्यांच्याविषयी आम्हाला काही बोलायचं नाही. पण उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना त्यांनी भान ठेवावं. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेतच, पण महाराष्ट्र लुटणाऱ्या दोन व्यापाऱ्यांविरोधात लढत आहेत, असंही राऊत म्हणाले.
निवडणूक कर्मचाऱ्यांनी एका दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी केली. त्यावर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. 'उद्धव ठाकरे यांची तपासणी करायला आमचा विरोध नाही. पण लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे हे फक्त एका तासासाठी नाशिकमध्ये आले होते. त्यांच्या हेलिकॉप्टरमधून १५ ते १६ बॅगा बाहेर काढण्यात आल्या. तेव्हा त्या बॅगा कोणीही तपासल्या नाहीत. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या बॅगाही कोणी तपासत नाही. या लोकांनी निवडणूक यंत्रणा विकत घेतली आहे का, असा प्रश्न राऊत यांनी केला.
संबंधित बातम्या