Sanjay Raut questions BJP : ‘शिवचरित्र म्हणजे राष्ट्र आणि प्रजेच्या कल्याणासाठी आयुष्याचा केलेला होम आहे. शिवचरित्राची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. पण भाजपच्या संत-महंतांनी नरेंद्र मोदींना श्रीमान योगी करून टाकले. शिवाजीराजांशी तुलना व्हावी असं कोणतं अचाट काम मोदींनी केलं,’ असा बोचरा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवरायांचं स्वराज्य हे पैशांतून, खोटेपणातून, ‘ईव्हीएम’च्या घोटाळ्यांतून निर्माण झालं नव्हतं, असा घणाघात राऊत यांनी केला आहे.
शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'तील संजय राऊत यांनी लेख लिहिला आहे. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात गोविंदगिरी नामक महाराजांनी मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. संजय राऊत यांनी त्यावर अत्यंत कठोर शब्दांत भाष्य केलं आहे. राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला उजाळा देताना मोदी सरकारच्या राजवटीतील सध्याच्या स्थितीवर बोट ठेवलं आहे.
'मोदींची तुलना जे छत्रपती शिवरायांशी करतात ते एक प्रकारे शिवरायांचाच अपमान करत आहेत. शिवरायांनी तलवारीच्या बळावर मोगली आक्रमणाशी सामना केला. त्यांच्या हातात राज्य आयतं पडलं नाही. ‘ईव्हीएम’ व श्रीमंत सावकारांच्या बळावर त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं नाही. ‘ईव्हीएम’ हे भाजपचे सुदर्शन चक्र आहे. ते नसेल तर मोदी व त्यांच्या पक्षाचं काय होईल? याचा खुलासा मोदींना घोड्यावर बसवणाऱ्यांनी करायला हवा, असा टोला राऊत यांनी हाणला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी काय केलं असतं? स्वराज्यात मणिपूरसारखे एखादे राज्य हिंसेच्या आगीत होरपळत असताना शिवाजीराजे स्वस्थ बसले नसते. निर्वासितांच्या छावण्यांत फिरले असते व शांतता प्रस्थापित होईपर्यंत मणिपुरातच राहुट्या ठोकल्या असत्या.
राजकीय स्वार्थासाठी हिंदू आणि मुसलमान असा भेद केला नसता. बलात्कारी, गुन्हेगार हिंदू आहे की मुसलमान हे पाहून त्यांनी न्याय केला नसता व न्यायाच्या नावाखाली गरीब मुसलमानांच्या घरांवर बुलडोझर फिरवले नसते.
स्वराज्याची सर्व मालमत्ता आपल्या सावकार मित्राच्या हवाली करून ‘गरिबी हटाव’च्या पोकळ वल्गना शिवरायांनी कधीच केल्या नसत्या.
शिवशाहीत त्यांनी विरोधकांना देशद्रोही ठरवून तुरुंगात डांबले नसते. त्यांच्याशी चर्चा करून मान राखला असता. दरबारात जनतेला न्याय मिळेल असे पाहिले असते.
शेतकरी, कष्टकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांचा त्यांनी कडेलोट केला असता. देशाच्या दुश्मनांना पळून जाऊ दिले नसते व राज्याचा खजिना लुटून श्रीमंती मिरवणाऱ्यांना स्वराज्याच्या सत्ता मंडळात कदापि स्थान दिले नसते.
शिवाजीराजांचे वैशिष्ट्य त्यांच्या लोकशाही विचारांत होते. खऱ्या लोकशाहीत गुणांवर नेमणुका झाल्या पाहिजेत. तशा नेमणुका शिवरायांनी केल्या. यामुळे शिवरायांच्या दरबारात व सैन्यात हिंदू होते तसे मुसलमानही होते. शिवाजी महाराजांना लोकशाहीची भीती वाटली नाही. मोदींची तुलना जे महाराजांशी करणाऱ्यांना देशातील एकाधिकारशाही व हुकूमशाहीचे थैमान दिसू नये, याबद्दल राऊत यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
‘लडाखमध्ये चीन घुसला आहे. काश्मिरी हिंदूंना त्यांच्या घरी जाता येत नाही. मणिपूर अशांत आहे. कारण पंतप्रधान पेशव्यांप्रमाणे पूजा, व्रतवैकल्ये, अनुष्ठानांत गुंतले आहेत. शिवाजी महाराज हिंदू रक्षक होतेच, पण ते सदैव ‘धर्म’, ‘देव देव’ करीत पूजेला बसले असते तर ते आग्य्राच्या कैदेतून सुटले असते काय व मोगलांना पळवून लावले असते काय?,’ असा सवालही राऊत यांनी केला आहे.