Sanjay Raut : मोदींना देशात तोंड लपवून फिरावं लागेल; संजय राऊत यांची जळजळीत टीका-shiv sena ubt mp sanjay raut attacks narendra modi and bjp over ashok chavan entry in bjp ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut : मोदींना देशात तोंड लपवून फिरावं लागेल; संजय राऊत यांची जळजळीत टीका

Sanjay Raut : मोदींना देशात तोंड लपवून फिरावं लागेल; संजय राऊत यांची जळजळीत टीका

HT Marathi Desk HT Marathi
Feb 13, 2024 11:15 AM IST

Sanjay Raut Slams PM Narendra Modi : अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जळजळीत टीका केली आहे.

Sanjay Raut slams PM Narendra Modi
Sanjay Raut slams PM Narendra Modi

Sanjay Raut Slams PM Narendra Modi : ‘कारगिल युद्धातील शहिदांच्या कुटुंबांसाठी राखीव जमिनीवर उभी राहिलेली इमारत हा नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीनं देशातला सगळ्यात मोठा घोटाळा होता. याच घोटाळ्याचा सूत्रधार आज भाजपमध्ये येतोय. जनता हे सगळं पाहतेय. मोदींना भविष्यात देशात तोंड लपवून फिरावं लागेल, अशी जहरी टीका खासदार संजय राऊत यांनी आज केली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे आजच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता त्यांचा प्रवेश होणार आहे. त्या संदर्भात विचारलं असता संजय राऊत यांनी भाजपवर तोफ डागली.

‘सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा कसा झाला हे सगळं देवेंद्र फडणवीस आजवर सांगत फिरत होते. त्याच्या क्लिप्स आजही उपलब्ध आहेत. त्यांनी स्वत:च्या क्लिप ऐकाव्या. मोदी काय बोलले होते तेही ऐकावं, असं राऊत म्हणाले. ‘महाराष्ट्र तर यांनी खड्ड्यात घातलेलाच आहे, पण यांचा स्वत:चा पक्षही राहिलेला नाही. भाजपची काँग्रेस झाली आणि काँग्रेसचं शुद्धीकरण झालंय. काँग्रेसशी थेट युती करता येत नसल्यानं भाजप अशा प्रकारे काँग्रेसशी युती करतोय. सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेऊन राजकारणात नवीन आदर्श निर्माण करण्याचं काम सुरू आहे,’ असं राऊत म्हणाले.

‘ज्यांच्या-ज्यांच्यावर आरोप केले, त्यांना पक्षात घेऊन पवित्र करून घेण्याचं काम सुरू आहे. या देशाचं राजकारण भाजपनं अक्षरश: नासवलंय. हे सगळं करून लोकसभा निवडणुकीत ४०० पार जाता येतील असं त्यांना वाटतंय. मात्र, भाजप २०० पारही जाणार नाही. महाराष्ट्रात भाजपनं कितीही फोडाफोडी केली तरी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला भाजपपेक्षा किमान १० जागा जास्त मिळतील,' असा विश्वासही संजय राऊत यांनी बोलून दाखवला.

चव्हाणांचा निर्णय त्यांच्यासाठीच धोक्याचा

अशोक चव्हाण यांच्या जाण्यामुळं काँग्रेसला काहीही फरक पडणार नाही. नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि त्यांच्या पत्नीचा दोनदा पराभव झाला आहे. नांदेड हा कोणाचाही बालेकिल्ला नाही. तिथं महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल. चव्हाण यांचा काँग्रेस सोडण्याचा निर्णय त्या पक्षासाठी नव्हे, तर त्यांच्यासाठी धोक्याचा आहे, असं राऊत म्हणाले.

‘अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेस नाही. अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी नाही आणि एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना नाही. त्यामुळं आमच्या महाविकास आघाडीवर कुठलाही परिणाम होणार नाही. जनता चिडलेली आहे ह्या सगळ्या राजकारणाला. त्याचा फायदा भविष्यात महाविकास आघाडीलाच होईल, असं राऊत यांनी ठणकावून सांगितलं.