Saamana Editorial : मोदी देवळात गेले तरी त्यांची नजर कॅमेऱ्याकडं असते; 'सामना'तून खोचक टोलेबाजी-shiv sena ubt mouthpiece saamana taunt pm narendra modi while reacting on maldives row ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Saamana Editorial : मोदी देवळात गेले तरी त्यांची नजर कॅमेऱ्याकडं असते; 'सामना'तून खोचक टोलेबाजी

Saamana Editorial : मोदी देवळात गेले तरी त्यांची नजर कॅमेऱ्याकडं असते; 'सामना'तून खोचक टोलेबाजी

Jan 10, 2024 12:14 PM IST

Saamana Editorial on PM Modi Lakshadweep Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लक्षद्वीप दौरा व त्यावरून सुरू झालेल्या वादावर ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’तून भाष्य करण्यात आलं आहे.

Narendra Modi
Narendra Modi

Shiv Sena UBT Targets PM Modi : मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारताबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीचा ठाकरेंच्या शिवसेनेनं तीव्र निषेध केला आहे. पंतप्रधानांचा अपमान हा १४० कोटी जनतेचा अपमान आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. मात्र, या निमित्तानं पंतप्रधान मोदी यांचं फोटोप्रेम व भाजपच्या राजकीय रणनीतीवर मुखपत्र 'सामना'तून अत्यंत खोचक शब्दांत टीका करण्यात आली आहे.

मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधानांचा अपमान केल्यानंतर भारतात 'बॉयकॉट मालदीव' हा ट्रेंड सुरू झाला आहे. यावरच सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. चीनधार्जिण्या राजकारणामुळं मालदीव भारताला वाकुल्य दाखवत असल्याचं 'सामना'नं म्हटलं आहे. मात्र, मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यामागे राजकीय रणनीती असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.

भरपूर मुलांना जन्म द्या! मोदी तुम्हाला घरं बांधून देतील; दोन बायका असलेल्या भाजप मंत्र्याचे धक्कादायक विधान

सोची समझी राजनीती

मोदी यांचा लक्षद्वीप दौरा हा ‘सोची समझी’ राजकीय रणनीतीचाच भाग असावा. २०२४ च्या राजकीय लढाईत एक-एक जागेचं महत्त्व आहे व ‘अबकी बार चारसे पार’चे उद्दिष्ट गाठणं सोपं नाही, किंबहुना कठीणच आहे. म्हणून लक्षद्वीपच्या एकमेव जागेसाठी मोदी व त्यांच्या प्रचारकांनी हे समुद्रनाट्य निर्माण केलं. आता देशातील अनेक सेलिब्रिटीजकडून ‘चलो लक्षद्वीप’चा नारा देण्यात आला. सलमान खानपासून जॉन अब्राहमपर्यंत अनेक नट मंडळींनी आता ‘चलो लक्षद्वीप’चा आग्रह धरला. यापुढं लक्षद्वीपच्या समुद्रतटांवर अनेक देशभक्त नटनट्यांचा वावर वाढू लागेल. पर्यटनास चालना मिळेल व हे सर्व मोदींमुळंच घडलं, असा डंका पिटून तेथील एकमेव लोकसभा जागेवर प्रचार केला जाईल, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

मोदी व फोटो यांच्यात जो कोणी येईल…

अग्रलेखातून मोदींवरही टीका करण्यात आली आहे. 'पंतप्रधान मोदी हे एक आत्ममग्न नेते आहेत. स्वतःचे फोटो, स्वतःचीच प्रसिद्धी, स्वतःचीच टिमकी हे त्यांचे धोरण आहे. मोदी व फोटो यांच्यात जो कोणी येईल त्यास ते स्वतः हात धरून बाजूला करतात हे सगळ्यांनीच पाहिलंय. मोदी हे उत्तम अभिनेते आहेत व त्यांचा ‘फोटोसेन्स’ चांगला आहे. देवळात एखाद्या पूजेसाठी, आरतीसाठी ते गेले तरी त्यांची नजर भगवंताच्या मूर्तीकडे नसते तर कॅमेऱ्याच्या ‘अँगल’कडे असते. मोदी हे कधी गळ्यात कॅमेरा लटकवून फोटोग्राफी करतात तर कधी ते स्वतःच्या मोबाईलवरून ‘सेल्फी’ घेताना दिसतात. जम्मू-कश्मीरमध्ये ‘पुलवामा’ कांड घडून चाळीस जवानांचं बलिदान झालं, त्या वेळी मोदी हे जिम कॉर्बेटच्या जंगलात एका शूटिंगमध्ये मग्न होते. त्यावरून टीका झाली तरी ते पर्वा करीत नाहीत व कॅमेरा-फोकस-लाईट्स-अॅक्शनच्या सान्निध्यात राहतात. ते केदारनाथला जातात व तेथील गुहेत तपाला बसतात. पण कॅमेरे त्यांच्या तपमूर्तीचे लाइव्ह चित्रण करीत असतानाही मोदी यांचा तपोभंग होत नाही, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.