Saamana Editorial : ‘लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर होणाऱ्या खुनशी टीकेवरून ठाकरेंच्या शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘नरेंद्र मोदी यांनी देशात पेरलेलं विष उगवलं आहे,’ अशी जळजळीत टीका ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनातून करण्यात आली आहे.
राहुल गांधी हे नुकतेच अमेरिका दौऱ्यावर गेले होते. तिथं त्यांनी भारतातील आरक्षण व्यवस्थेवर काही मतं मांडली होती. पक्षपात असेपर्यंत आरक्षण संपवता येणार नाही. पक्षपात थांबला तर आरक्षण थांबवण्यावर विचार करता येईल, असं ते म्हणाले होते. त्यावरून काँग्रेस आरक्षण संपवत असल्याची टीका भाजप व त्यांच्या मित्रपक्षांनी सुरू केली.
भाजप व त्यांच्या मित्रपक्षाचे नेते राहुल यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. राहुल गांधींची जीभ छाटायला हवी… त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवेत अशी वक्तव्य सत्ताधारी आमदार व खासदार करत आहेत. त्यावरून 'सामना'नं मोदी-शहांना लक्ष्य केलं आहे.
'राहुल गांधी यांच्याबाबत भाजप व त्यांच्या गोतावळ्यानं केलेली वक्तव्यं भयंकर आहेत. नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत जे विष पेरलं ते कसं उगवलंय याचं हे चित्र आहे. ‘फेक नरेटिव्ह’ निर्माण करण्याच्या कारखान्याचे मालक मोदी, शहा व फडणवीस असे लोक आहेत व त्यांनी गांधी हे आरक्षणविरोधी असल्याचा प्रचार सुरू केला. आता भाजप व त्यांच्या लोकांनी गांधी यांच्या संदर्भात हिंसक वक्तव्यं करायला सुरुवात केली. राहुल यांची अवस्था त्यांच्या आजी इंदिरा गांधींसारखी करू, असं एक आमदार म्हणतो. हा गांधी यांच्या जिवाशी खेळण्याचाच प्रकार आहे. केंद्रातले रेल्वे राज्यमंत्री, उत्तर प्रदेश सरकारमधील एक मंत्री राहुल गांधींबाबत अभद्र आणि हिंसक वक्तव्यं करतात. हे चित्र बरे नाही, अशी खंत अग्रलेखात व्यक्त करण्यात आली आहे.
'राहुल गांधी हे विरोधी पक्षाचे नेते आहेत व त्यांच्या पक्षाचे शंभर खासदार निवडून आले आहेत. सरकारच्या खोट्या व चुकीच्या गोष्टींची गय न करता त्यांनी मोदी सरकारला सळो की पळो करून सोडलं आहे. विरोधी पक्षनेत्याचं हे कर्तव्यच आहे व भारतीय संविधानानं त्यांना हा अधिकार बहाल केला आहे. संविधानाने दिलेल्या अधिकाराचं ते पालन करीत आहेत. त्यामुळं चिडलेला भाजप त्यांची जीभ कापणार असेल तर या देशात इदी अमिनशाही सुरू आहे हे मान्य करावं लागेल, असा संताप ठाकरेंच्या शिवसेनेनं व्यक्त केला आहे.
'प्रश्न राहुल गांधींचा नसून देशातील लोकशाही परंपरेचा आहे. देशातील आरक्षण संपवायचा अधिकार कुणा एका व्यक्तीला व त्याच्या पक्षाला नाही. दलित, शोषित, भटके, विमुक्त, आदिवासी, ओबीसी व आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना स्वाभिमानानं जगण्यासाठी भारतीय संविधानानं आरक्षण दिलं आहे. ते कुणाच्या बोलण्यानं व भाषणानं कसं रद्द होणार? पण भाजपवाले खोटे बोलण्यात व फेक नरेटिव्ह निर्माण करण्यात वस्ताद आहेत. त्यांना जातीय दंगली घडवायच्या आहेत व त्यासाठी ते संधी शोधत आहेत, असा आरोप अग्रलेखात करण्यात आला आहे.
'राहुल गांधी यांच्यासह मोदींना विरोध करणाऱ्या सर्वच नेत्यांना वधस्तंभावर चढवायचं असं भाजपनं ठरवलं आहे. त्यासाठीच ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांचा वापर करून खोटी प्रकरणं तयार केली गेली व विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आले, पण त्या तुरुंगाचं भय आता उरलेलं नाही. मोदींचंही भय आता संपलं आहे. कारण या लोकांनी सर्वच बाबतीत अतिरेक केला आहे आणि आता ते हिंसक बोलण्याचा अतिरेक करीत आहेत. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मोदींचा तसा पराभवच केला. तरीही त्यांचं डोकं भलत्याच दिशेनं चालत आहे, असा टोला अग्रलेखातून हाणला आहे.