Saamana Editorial : ‘राज ठाकरे यांची मनसे आणि भारतीय जनता पक्षाची ‘तन-मन-धना’ची छुपी युती आहे. राज ठाकरेंचं निवासस्थान जणू राजकीय कॅफे आहे. तिथं भाजपचे नेते नियमित चहापानासाठी येत असतात. काही लोकांसाठी या कॅफेत राखीव जागा आहेत,' अशी जोरदार टोलेबाजी 'सामना'तून करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच राज ठाकरे यांच्या दादर इथल्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत. राज ठाकरे यांच्या चिरंजीवांना विधान परिषदेची ऑफर दिल्याचं बोललं जात आहे, तर मुंबई महापालिकेच्या रणनीतीविषयी दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचंही बोललं जात आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर 'सामना'नं आज 'कॅफेतल्या भेटीगाठी' या शीर्षकाखाली अग्रलेख लिहिला आहे. त्यात या भेटीवर भाष्य करण्यात आलं असून मोदी-शहांच्या नेतृत्वाखालील भाजपवर टीका करण्यात आली आहे.
> 'मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीत तर्क लढविण्यासारखे काही नाही. ही काही त्यांची पहिलीच भेट नव्हती. भाजपचे इतरही नेते राज यांच्या घरी नियमित चहापानासाठी जात-येत असतात. मनसेप्रमुखांचं निवासस्थान हे सध्या राजकीय ‘कॅफे’ बनलं आहे व भाजपच्या शेलार, लाड वगैरे अतिज्येष्ठ नेत्यांना त्या कॅफेत राखीव जागा आहेत. मुख्यमंत्री तिथं गेले यात नवल नाही. भाजप व राज यांच्या ‘मनसे’ पक्षाची ‘तन-मन-धना’ची युतीच आहे. त्यामुळं युतीतील पक्षांशी संवाद ठेवण्यासाठी मुख्यमंत्री तिथं गेले असतील.
> शिवसेना-भाजप युती असतानाही मुख्यमंत्री ‘मातोश्री’वर चहापानासाठी येतच होते, पण आता राजकारण हे इरेला व ईर्षेला पेटलं असल्यानं कोण कोणाकडं जातात, चहापान करतात यावर मीडियाचे कॅमेरे रोखलेलेच आहेत. हल्लीच शरद पवार हे डाळिंबवाल्या शेतकऱ्यांना व साहित्य संमेलनवाल्यांना घेऊन पंतप्रधान मोदींना भेटले. त्यावरूनही चर्चांना नुसतं उधाण आलं. कोणी कोणास भेटावं यावर बंधनं नसली तरी केंद्रात मोदी-शहा व महाराष्ट्रात फडणवीस-शिंदे वगैरे लोकांचं सरकार आल्यापासून राजकारणातला मोकळेपणा संपला आहे.
> ‘राजकारणात भेटीगाठी होतच राहतात. त्यामुळे आताही कोण कोणास व का भेटतात त्यावर चर्चा का करावी? महाराष्ट्राला आता सर्वच पातळींवर खुजे नेतृत्व लाभलं आहे. त्यामुळं त्यांचे विचारही खुजेच असणार. शिवसेनेच्या पहिल्या महाअधिवेशनात तर घोर वैचारिक विरोधक श्रीपाद अमृत डांगे यांना मुख्य वक्ते म्हणून आमंत्रित केले गेले होते व शिवसेनाप्रमुखांनी डांगे यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते, पण आता हे घडेल काय? तर अजिबात नाही.
'आज महाराष्ट्रात चित्र काय आहे? द्वेष, मत्सर, फोडाफोडीचे राजकारण इरेला पेटलं आहे व एकमेकांना राजकारणातून कायमचे खतम करण्यापर्यंत ते पोहोचलं आहे. हा बदल मागच्या दहा वर्षांत जास्त झाला. हे असं का घडलं? महाराष्ट्रात हे विष कोणी पेरलं? यावर एकत्र बसून चिंतन करण्याची गरज आहे, असं अग्रलेखात नमूद करण्यात आलंय.
राजकारणात कोण कोणाबरोबर आहे ते समजणं सध्या कठीण झालं आहे व महाराष्ट्रातलं वातावरण पूर्वीसारखं स्वच्छ राहिलेलं नाही. एकमेकांना भेटणं, बोलणं तर दूरच, एकमेकांकडं पाहून हसणंही अडचणीचं ठरत आहे. ही भारताला मोदी-शहाकृत भाजपची मिळालेली देणगी आहे. देशाचा एक प्रकारे कोंडवाडाच झाला आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या