विधानसभा निवडणुकीत पराभवाचा अनपेक्षित धक्का बसलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपुढं आता टिकून राहण्याचं आव्हान निर्माण झालं आहे. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेनेसाठी कसोटी ठरणार आहे. विधानसभेला महाविकास आघाडीचा फारसा फायदा न झाल्यानं मुंबईची निवडणूक स्वबळावर लढण्याचा विचार पक्षात सुरू आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली. काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना ही नवी आघाडी राज्यात निर्माण झाली. त्यातूनच फुटून निघालेल्या दोन गटांनी पक्षाचा दर्जा मिळवून भाजपसोबत महायुती स्थापन केली. या आघाडी व महायुतीनं लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढल्या. त्यात लोकसभेला महाविकास आघाडीला यश मिळालं, तर विधानसभेत महायुतीनं बाजी मारली. मात्र, दोन्ही वेळा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आघाडीचा सर्वाधिक फटका बसल्याचं पाहायला मिळालं.
लोकसभेला महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा लढणाऱ्या शिवसेनेला केवळ ९ जागा मिळाल्या, तर विधानसभेला काँग्रेसपेक्षा कमी जागा लढूनही सर्वाधिक जागा मिळाल्या. मात्र तो आकडा फक्त २० होता. याउलट मूळ पक्षातून फुटून निघालेल्या शिंदेंच्या शिवसेनेची सरशी झाली. त्यामुळं आता ठाकरेंच्या शिवसेनेत चलबिचल सुरू झाली आहे.
काँग्रेसशी आघाडीचा निवडणुकीत फारसा उपयोग होत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळं आगामी मुंबई महापालिका निवडणूक एकट्याच्या बळावर लढण्याचा विचार सुरू झाला आहे. तळागाळातील शिवसैनिकांकडून तशी मागणी होत आहे.
२०१७ च्या निवडणुकीत तेव्हाच्या शिवसेनेनं सर्वाधिक ८४ जागा मिळवून महापालिकेत सत्ता स्थापन केली होती. आता शिवसेनेत फूट पडली असली तरी ठाकरेंच्या शिवसेनेची मुंबईतील ताकद कायम आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत हे दिसून आलं आहे. लोकसभेला ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबईत सहापैकी ३ जागा जिंकल्या होत्या. एक जागा अवघ्या काही मतांनी गमावली. तर, विधानसभेतही अपवाद वगळता मागच्या वेळच्या सर्व जागा राखल्या आहेत.
महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईत अजिबात ताकद नाही. तर, काँग्रेसची ताकद खूपच कमी आहे. वर्षानुवर्षे मुंबईत काँग्रेस कमकुवत झाली आहे. तसंच, या पक्षात गजबाजीही आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपात बराच वेळ गेला. त्यातून अंतर्गत नाराजी वाढली व बंडखोरीही झाली. या सगळ्या चुका यावेळी टाळण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळं जागावाटपाचं गुऱ्हाळ न लावता आणि शिवसैनिकांना नाराज न करता स्वबळावर सर्व जागा लढाव्यात, असा विचार पक्षात सुरू आहे. उद्धव ठाकरे याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.