Uddhav Thackeray News: मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी बंद मागे घेण्याचे आवाहन केले. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि शरद पवार यांच्या पाठोपाठ बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण महाविकास आघाडीतील नेते तोंडाला फिती लावून निषेध करतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
' शरद पवार यांच्या आवाहनानंतर मी बंद मागे घेतो. मुंबई कोर्टाचा निर्णय मान्य नाही. परंतु, वेळेअभावी सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकत नाही. भावना व्यक्त करण्याचा अधिकार जनतेला आहे की नाही? आम्ही बंद करणार नाही, मात्र आंदोलन स्वरुपात निषेध नोंदवणार आहोत. उद्या सकाळी ११ वाजता मी स्वत: शिवसेना भवनासमोरच्या चौकात बसून निषेध नोंदवणार. उद्याचा बंद मागे घेत असलो म्हणून त्याचा अर्थ असा होत नाही की, भविष्यात बंद केला जाणार नाही, हा जनतेचा अधिकार आहे, तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ज्या पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे, इतक्याच वेगाने बदलापूर घटनेतील आरोपीला शिक्षा दिली जाईल, अशी अपेक्षा करतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
याआधी उद्धव ठाकरेंनी बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, तसे न केल्यास विरोधक रस्त्यावर उतरतील, असा इशारा त्यांनी दिला. बदलापूरमधील एका शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी ७२ जणांना अटक केली आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'बदलापुरात अजूनही अटक होत आहे. आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शाळा प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली नाही आणि म्हणूनच त्यांच्याविरुद्ध पॉक्सो कायद्याच्या कलम २१ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला व बालकांसाठी विशेष शाखा किंवा 'मिनी पोलीस स्टेशन' स्थापन करण्याची शिफारस केली आहे.
पॉक्सो कायद्यातील कलम १९ मधील तरतुदींचे पालन न केल्याबद्दल एसआयटीने शुक्रवारी शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल केला. प्रत्येक प्राधिकरणाला अल्पवयीन मुलांवरील अशा प्रकारच्या लैंगिक अत्याचाराची माहिती मिळताच पुढील कारवाईसाठी त्याची माहिती पोलिसांना द्यावी लागेल.