Sanjay Raut news : माझगाव येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयानं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना १५ दिवसांची साधी कैद आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेल्या मानहानीच्या खटल्यात राऊत यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.
संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. त्या विरोधात मेधा सोमय्या यांनी कोर्टात धाव घेतली होती. 'मी एक प्राध्यापक आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्ससारख्या संस्थेशी जोडलेली आहे. राऊत यांच्या आरोपांमुळं माझी मानहानी झाली आहे, असं मेधा सोमय्या यांनी तक्रारीत म्हटलं होतं. कोर्टानं त्यांच्या तक्रारीची घेतली होती. त्यावर आज निर्णय देण्यात आला.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये संजय राऊत यांनी लेख लिहिला होता. त्यात किरीट सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेवर १०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करण्यात आले होते. पर्यावरण अधिकाऱ्यांकडून आवश्यक परवानग्या न घेता खारफुटीची झाडं तोडून अनधिकृत शौचालये बांधल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. मेधा सोमय्या यांचाही यात सहभाग असल्याचं राऊत यांनी म्हटलं होतं. चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या आरोपांचा पुनरुच्चार केला होता. मेधा सोमय्या यांनी या संदर्भातील क्लिप न्यायालयात सादर केली.
न्यायालयाच्या निकालावर संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी न्यायालयांचा आदर करतो, पण त्यांनी असा आदेश दिला यावर विश्वास बसत नाही. ज्या देशात पंतप्रधान गणेशोत्सवासाठी सरन्यायाधीशांच्या घरी जातात आणि मोदक खातात, त्या देशात न्यायाची अपेक्षा कशी करता येईल?,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.
'मला न्याय मिळाला याचा मला आनंद आहे. माझ्यावरील आणि माझ्या कुटुंबीयांवरील आरोप खोटे ठरले आहेत. न्याय मिळावा म्हणून मी लढा दिला आणि कुटुंबातील इतर कोणत्याही महिलेनं जे केलं असतं, तेच केलं. शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझ्या पदाचा न्यायालयानं आदर केला आहे, असं मला वाटते. या निर्णयाविरोधात अपील करण्याच्या आरोपींच्या अधिकाराबद्दल मला काहीही सांगायचं नाही, असंही त्या म्हणाल्या.