मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  sanjay raut : देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या इच्छेमागे मोठं राजकारण?; संजय राऊत थेट बोलले!

sanjay raut : देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या इच्छेमागे मोठं राजकारण?; संजय राऊत थेट बोलले!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jun 06, 2024 11:14 AM IST

sanjay raut on devendra fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची व्यक्त केलेली इच्छा ही जाणीवपूर्वक खेळलेली चाल असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

फडणवीसांच्या राजीनाम्याच्या इच्छेमागे मोठं राजकारण?; संजय राऊत थेट बोलले!
फडणवीसांच्या राजीनाम्याच्या इच्छेमागे मोठं राजकारण?; संजय राऊत थेट बोलले!

sanjay raut on devendra fadnavis : भाजपच्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. फडणवीस यांनी व्यक्त केलेली ही इच्छा म्हणजे योगी आदित्यनाथ यांच्यावर दबाव टाकण्याची रणनीती आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ते वृत्तवाहिन्यांशी बोलत होते. ‘भाजपचा जसा महाराष्ट्रात पराभव झाला आहे, तसाच उत्तर प्रदेशातही झाला आहे. त्यामुळंच फडणवीस राजीनाम्याच्या गोष्टी करत आहेत. योगी आदित्यनाथ यांच्यावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, भाजपच्या देशातील पराभवाची जबाबदारी स्वीकारून नरेंद्र मोदी यांनीच राजीनामा दिला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

काय आहे राजकारण?

२०१९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपनं २३ जागा जिंकल्या होत्या, तो आकडा आता ९ वर आला आहे. तर, उत्तर प्रदेशात भाजपच्या जागांची संख्या ६३ वरून ३३ वर आली आहे. यूपीतील अपयशाचा ठपका ठेवून योगी आदित्यनाथ यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. मात्र, थेट त्यांच्यावर कारवाई करणं भाजप नेतृत्वाला सोपं नाही. त्यामुळंच त्यांच्यावर अप्रत्यक्ष दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे. संजय राऊत यांनी त्याकडंच लक्ष वेधलं आहे.

ही फडणवीसांची नौटंकी

राजीनाम्याची इच्छा ही देवेंद्र फडणवीस यांची नौटंकी आहे. राजकारणात अशी नाटकं चालतच असतात. नरेंद्र मोदी सुद्धा अशी नाटकं करतात. कधी रडतात, कधी हसतात, कधी बसतात, कधी त्यांना धाप लागते. हे सगळे त्यांचेच चेले आहेत. महाराष्ट्रानं फडणवीस यांना नाकारलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जर कुणी व्हिलन असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्याचमुळं महाराष्ट्रात भाजपची दुर्गती झालीय. सुडाचं, छळ आणि कपटाचं राजकारण त्यांनी केलं. महाराष्ट्र हे सभ्यता आणि संस्कारांचं राजकारण केलं होतं. त्यात विष कालवण्याचं काम फडणवीसांनी केलं. त्याची किंमत आता त्यांना चुकवावी लागत आहे,' असं राऊत म्हणाले.

काँग्रेसच्या जागांमध्ये शिवसेनेचंही योगदान

महाराष्ट्रात काँग्रेसच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत. याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, काँग्रेसच्या जागा निवडून येण्यात शिवसेनेचंही योगदान आहे. उद्धव ठाकरे राज्यात फिरले असते तर आघाडीच्या इतक्या जागा आल्या असत्या का? आम्ही प्रत्येक मतदारसंघात प्रचार केला. ही शिवसेनेची, ही काँग्रेसची जागा असं आम्ही केलं नाही, असं राऊत म्हणाले. महाविकास आघाडी यापुढंही मजबुतीनं काम करेल. आमच्या मनात कुठलाही अहंकार नाही,' असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

टी-२० वर्ल्डकप २०२४