Ladki Bahin Yojana: महायुती सरकारने (Mahayuti) महिलांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून (Ladki Bahin Yojana) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. राज्यातील महिला महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केल्याचे म्हटले आहे. तर, दुसरीकडे लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली सरकार महिलांची दिशाभूल करत आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने हा निर्णय घेतल्याचे महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) म्हणणे आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असता शिवसेना यूबीटी पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) आमचे सरकार आल्यावर लाडकी बहिण योजनेत रक्कम वाढवू, असे अश्वासन दिले.
आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘महायुती सरकारने अनेक योजना जाहीर केल्या.जाहिराती येतात पण पुढे काही होत नाही, कांना विरोध असताना तीन वेगळ्या दिशेल चालणारी लोक असताना काय होऊ शकते? हे दिसले. महाविकास आघाडीचे सरकार येताच लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणारी रक्कम वाढवली जाईल’, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
कोस्टल रोडवरून बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘खोके सरकारने कोस्टल रोडला एक वर्ष उशीर लावला. डिसेंबर २०२३ ची डेडलाईन होती. पण वेळेत काम पूर्ण झाले नाही. वेळ वाढवूनही पुढे काही होत आहे. आतापर्यंत कितीवेळा कोणत्या भागाचा कालावधी वाढवून घेतला आहे? याबाबत चौकशी करायला हवी.’
मध्य प्रदेशच्या 'लाडली बहना योजने'पासून प्रेरणा घेऊन ही योजना २१ ते ६० वयोगटातील विवाहित, घटस्फोटित आणि निराधार महिलांना दरमहा १,५०० रुपये देते. आतापर्यंत १.८ कोटी अर्ज मंजूर झाले आहेत. गेल्या तीन दिवसांत १ कोटी ३ लाख पात्र महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत, तर इतर महिलांच्या अर्जांची छाननी सुरू असून त्यांना तीन महिन्यांसाठी साडेचार हजार रुपये देण्यात येणार आहेत. महायुती सत्तेत आल्यास ही योजना सुरूच राहील, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. लाडकी बहीण योजनेला संपूर्ण महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.