राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीत ठाकरे गटानं कोणत्या मुद्यावर चर्चा केली? संजय राऊतांनी दिली सविस्तर माहिती
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीत ठाकरे गटानं कोणत्या मुद्यावर चर्चा केली? संजय राऊतांनी दिली सविस्तर माहिती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीत ठाकरे गटानं कोणत्या मुद्यावर चर्चा केली? संजय राऊतांनी दिली सविस्तर माहिती

Updated Nov 18, 2023 04:33 PM IST

UBT Leaders Meet Draupadi Murmur : शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यात आली. या भेटीत कोणत्या मुद्यावर चर्चा झाली. याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

UBT Leaders Meet Draupadi Murmur
UBT Leaders Meet Draupadi Murmur

Shiv Sena UBT Group Meet Droupadi Murmu : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापलेला असताना आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या भेटीत मराठा आरक्षणासह राज्यातील राजकीय परिस्थिती आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर राष्ट्रपतींसोबत चर्चा केल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रपतींच्या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

धनगर आणि मराठा आरक्षणप्रश्नी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे, संजय जाधव,  प्रियंका चतुर्वेदी, ओमराजे निंबाळकर, अंबादास दानवे, अजय चौधरी, अनिल परब आणि सुनील प्रभू आदिंचा समावेश होता.

संजय राऊत म्हणाले की, ओबीसी, आदिवासी यांच्यासह अन्य कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यायचे असेल तर त्यांना सामावून घेण्यासाठी घटनेमध्ये तरतूद करावी लागेल त्याचबरोबर आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागेल. हे राज्य सरकारच्या हातात नसून, केंद्र सरकार आणि संसदेच्या हातात आहे. या घटनादुरुस्तीसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे किंवा ०४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात घटनादुरुस्तीचा प्रस्ताव आणून महाराष्ट्रातील परिस्थितीचा तोडगा काढावा, अशी मागणी राष्ट्रपती यांच्याकडे केली.

राऊत म्हणाले की, राष्ट्रपती मुर्मू यांच्याशी आमची आरक्षण व अन्य मुद्द्यावर प्रदीर्घ चर्चा झाली. महाराष्ट्रातील परिस्थिती राष्ट्रपतींनी समजून घेतली. प्रश्न समजून घेतला. या विषयात लक्ष घालण्याचे आश्वासन राष्ट्रपतींनी आम्हाला दिले. आम्हाला खात्री आहे की, राष्ट्रपती ज्या समाजातून आल्या आहेत, त्यांना आरक्षणाचे महत्त्व माहिती आहे, त्यांना आर्थिक मागासलेपण काय असते ते माहिती आहे. त्यांना प्रश्न माहिती आहे आणि त्याबाबत त्यांनी आमच्याशी चर्चाही केली. तसेच राज्यातील जी स्थिती आहे, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे संजय राऊत यांनी सांगितले. शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनाचा राष्ट्रपती मुर्मू यांनी स्वीकार केला.

उद्धव ठाकरेंच्या आदेशाने आम्ही राष्ट्रपतींना भेटलो, असे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी संजय राऊतांनी केली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर