Uddhav Thackeray Rally in Pen : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पावर (Budget 2024) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत बोचरी प्रतिक्रिया दिली आहे. महिला व शेतकऱ्यांसाठी काम करण्याच्या सरकारच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी कडाडून टीका केली आहे. 'महिलांसाठी काम करणार आहात तर आधी मणिपूरच्या महिलांना भेटा. बिल्किस बानोला भेटा, असं उद्धव ठाकरे यांनी सुनावलं आहे.
पेण इथं झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. केंद्र सरकार पुढील काळात गरीब, महिला, शेतकरी व तरुण या चार जातींसाठी काम करेल, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली. तोच धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
'निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर हे बोलण्याचं धाडस दाखवलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच करायला पाहिजे. हा देश म्हणजे पंतप्रधानांचे सुटाबुटातले मित्र नाहीत. त्यांच्या पलीकडंही देश आहे. गरीब, महिला, शेतकरी व तरुण हे या देशात आहेत. निवडणुका आल्यावर का होईना हे सरकारला कळलं. दहाव्या वर्षी या जाती यांना कळल्या. तोपर्यंत माहीतच नव्हतं. अदानीसाठी दहा वर्षे घालवली, पण तेवढाच हा देश नाही हे कळलं ते बरं झालं, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.
‘महिलांकडं लक्ष देण्याच्या गोष्टी सांगता, मग मणिपूरच्या महिलांकडं का जात नाही? मणिपूरमध्ये जा. तिथं ज्या महिलांवर अत्याचार झाले त्यांना सांगा की या देशात महिला आहेत हे आम्हाला आतापर्यंत माहीतच नव्हतं. आता निवडणुका आल्यात, आता महिलांची मतं पाहिजेत. आम्ही आता तुमच्यासाठी काम करणार आहे असं सांगा. 'बिल्किस बानोकडं जा. तिच्यावर अत्याचार करणाऱ्यांना तुम्हीच सोडलं होतं. तिला जाऊन सांगा की आम्ही तुझ्यासाठी काम करणार आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सरकारला सुनावलं.
‘उत्तरेतल्या शेतकऱ्यांनी काही वर्षांपूर्वी आंदोलन केलं होतं. थंडी, वारा, ऊनाची पर्वा न करता त्यांनी आंदोलन केलं. याच सरकारनं त्यांना अतिरेकी ठरवलं होतं. आता अतिरेक्यांना शेतकरी समजायला लागलात आणि त्यांची कामं करायला लागलात?,’ असा बोचरा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. हा सगळा भुलभुलय्या आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार आहे,' अशी तोफ उद्धव ठाकरे यांनी डागली.
'आता सिलिंडर स्वस्त होतील. निवडणूक झाली की दुपटीनं भाव वाढतील. तरुणांना नोकऱ्या देणार म्हणे. दहा वर्षे आम्ही हेच ऐकत आलोय. दहा वर्षे केलंत काय तुम्ही? आम्हाला आता तुमच्या फसव्या अर्थसंकल्पाची गरज नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सुनावलं.