Uddhav Thackeray : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक तपासणीत त्यांच्या हृदयात ब्लॉकेजेस आढळल्यामुळं त्यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती सूत्रांंनी दिली आहे.
उद्धव ठाकरे हे हृदयविकारानं त्रस्त आहेत. यापूर्वी २०१२ मध्ये त्यांच्यावर दोन वेळा अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली होती. तसंच, त्यांच्या हृदयात स्टेंट टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर ते सार्वजनिक जीवनात सक्रिय होते. आता पुन्हा त्रास होऊ लागल्यामुळं तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
तिथं प्राथमिक तपासण्या करून अॅन्जिओग्राफी करण्यात आली. त्यात त्यांच्या हृदयात ब्लॉकेजेस असल्याचं आढळून आलं. त्यानंतर लगेचच अॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं. त्यांना आजच रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. अॅन्जिओप्लास्टीच्या प्रक्रियेत एक लांबलचक पातळ ट्यूब (कॅथेटर) रक्तवाहिन्यांमध्ये टाकली जाते व ब्लॉकेजेस दूर केले जातात.
अॅन्जिओप्लास्टी ही हृदयविकारानं त्रस्त असलेल्या रुग्णावर केली जाणारी एक शस्त्रक्रिया असते. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये काही अडथळा आढळून आल्यास ही शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. हे ब्लॉकेजेस आहेत की नाहीत? किंवा कितपत आहेत हे जाणून घेण्यासाठी आधी अॅन्जिओग्राफी ही चाचणी केली जाते.
गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे हे शिवसेनेचं नेतृत्व करत आहेत. त्यांना राजकीय जीवनात अनेक चढउतारांचा सामना करावा लागत आहे. मात्र ते खचले नाहीत. मधल्या काळात त्यांच्या पक्षात उभी फूट पडली. त्यांनी अत्यंत धीराने या सगळ्याचा सामना केला. इतकंच नव्हे लोकसभा निवडणुकीत हिंमतीनं लढून शिवसेनेचे ९ खासदार जिंकून आणले. गेल्या काही दिवसांपासून ते विधानसभेच्या तयारीला लागले होते. दोनच दिवसांपूर्वी मुंबईतील शिवतीर्थावर त्यांनी पक्षाच्या परंपरागत दसरा मेळाव्याला संबोधित केलं. या मेळाव्यात त्यांनी खणखणीत भाषण करत सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली होती. त्यावेळी ते एकदम फिट दिसत होते. मात्र त्यानंतर अचानक त्रास सुरू झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.