amol kirtikar vs ravindra waikar : लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जोरदार कामगिरी करत ९ जागा जिंकल्या आहेत. मुंबईतही ठाकरेंच्या शिवसेनेनं तीन जागा जिंकत ताकद दाखवून दिली. चौथी जागा अवघ्या ४८ मतांनी गेली. मात्र या निकालाबाबत पक्षाबरोबच उमेदवार अमोल किर्तीकर यांनाही शंका असून त्या निकालाला ते न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.
मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल किर्तीकर यांनी निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या आधीच शिंदे गटात गेलेले रवींद्र वायकर यांचं आव्हान होतं. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून किर्तीकर व वायकर यांच्यात अटीतटीची लढत झाली. मतमोजणीची ही प्रक्रिया आयपीएलच्या एखाद्या सामन्यापेक्षाही थरारक झाली. कधी पारडे वायकरांकडं तर कधी किर्तीकरांकडं झुकत होतं. शेवटी जवळपास ६८५ मतांनी किर्तीकर यांना विजयी घोषित करण्यात आलं.
रवींद्र वायकर यांनी किर्तीकर यांच्या विजयाला आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली. सुरुवातीला ती अधिकाऱ्यांनी फेटाळली. मात्र ते ठाम राहिल्यानं पुन्हा मतमोजणी करावी लागली. त्यात वायकर पुन्हा आघाडीवर आले. ही मतमोजणी करताना काही पोस्टल मतं बाद करण्यात आली. किर्तीकर यांनी त्यास आक्षेप घेतला. मात्र अधिकाऱ्यांनी तो आक्षेप फेटाळून लावत वायकर यांना ४८ मतांनी विजयी घोषित केलं.
किर्तीकरांनी या निकालावर आक्षेप कायम ठेवला आहे. काही मतांची मोजणी झालेली नसल्याचं किर्तीकर यांचं म्हणणं आहे. ईव्हीएमच्या मतमोजणीनुसार वायकर आणि किर्तीकर यांच्यात ६०० मतांचा फरक आहे. त्याचं स्पष्टीकरण किर्तीकर यांना हवं आहे. त्यासाठी त्यांना संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ फूटेज हवं आहे. तशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडं व संबंधित अधिकाऱ्यांकडं केली आहे. या फूटेजचं निरीक्षण करून आवश्यकतेनुसार ते न्यायालयात दाद मागणार आहेत.
निकालाच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांना किर्तीकरांच्या पराभवाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, इथं नक्कीच मोठी गडबड झालेली आहे. वेळ पडल्यास आम्ही न्यायालयात आव्हान देऊ, असं स्पष्ट केलं होतं.