माहीममध्ये तुंबळ लढत होणार! अमित ठाकरेंविरोधात शिंदे सेनेनंतर आता उद्धव ठाकरेंचाही तगडा उमेदवार!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  माहीममध्ये तुंबळ लढत होणार! अमित ठाकरेंविरोधात शिंदे सेनेनंतर आता उद्धव ठाकरेंचाही तगडा उमेदवार!

माहीममध्ये तुंबळ लढत होणार! अमित ठाकरेंविरोधात शिंदे सेनेनंतर आता उद्धव ठाकरेंचाही तगडा उमेदवार!

Updated Oct 23, 2024 04:05 PM IST

Mahim Assembly Constituency : उद्धव ठाकरे गट माहिम मतदार संघाबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महेश सावंत यांना माहीम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.

अमित ठाकरेंविरोधात उद्धव ठाकरेंनीही उतरवला तगडा उमेदवार
अमित ठाकरेंविरोधात उद्धव ठाकरेंनीही उतरवला तगडा उमेदवार

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राजकीय पक्षांकडून उमेदवार याद्या जाहीर केल्या जात आहेत. आता राज्याचे लक्षमाहीम विधानसभा मतदारसंघाकडे लागले असून ठाकरे घराण्याचा दुसरा राजपुत्र निवडणुकीच्या रिंगणार उतरला आहे. येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना मनसेकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. मनसेने आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिल्याने उद्धव ठाकरे गट माहिम मतदारसंघाबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महेश सावंत (Mahesh Sawant) यांना माहीम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.

अमित ठाकरेंना माहीम मतदारसंघातून मनसेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही तासातच शिवसेना शिंदे गटाकडून पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. त्यात माहीम मतदारसंघातून आमदार सदा सरवणकर यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे आता सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे विरुद्ध महेश सावंत अशी तिहेरी लढत माहीम मतदारसंघात होणार आहे.

माहीम मतदारसंघातील लढत हायव्होल्टेज बनली आहे. मनसे आणि शिंदे गटाने या मतदारसंघात दिग्गज उमेदवार रिंगणात उतरवल्यानंतर ठाकरे गटानेही आपला तगडा शिलेदार मैदानात उतरवला आहे. ठाकरे गटाने माहीम मतदारसंघातून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

आदित्य ठाकरेंविरोधात वरळी मतदारसंघात मनसेने संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिल्यानंतर आता उद्धव सेनेनेही अमित ठाकरेंविरोधात उमेदवार जाहीर करत माहीमची लढत रंगतदार केली आहे. माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांच्यासोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुसरीकडे शिवसेनेतील बंडात एकनाथ शिंदे यांना साथ देणारे आमदार सदा सरवणकर देखील निवडणुकीच्या रिंगणात असणार असून आता ठाकरेंच्या शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केल्याने येथे तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

शिवसेना ठाकरे गटाकडून विभागप्रमुख महेश सावंत आणि प्रकाश पाटणकर यांच्या नावाची चर्चा होती. अखेर महेश सावंत यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभादेवी-दादरमध्ये शिवसेनेतील फुटीनंतर महेश सावंत यांनी आक्रमक भूमिका घेतली होती,  त्याचे बक्षीस त्यांना उमेदवारीच्या रुपात मिळाले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या