मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sunil Raut: संजय राऊत यांच्या सुटकेसाठी शिवसेनेची फिल्डिंग; आमदार सुनील राऊत दिल्लीला

Sunil Raut: संजय राऊत यांच्या सुटकेसाठी शिवसेनेची फिल्डिंग; आमदार सुनील राऊत दिल्लीला

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Sep 10, 2022 11:36 AM IST

Sunil Raut in Delhi: खासदार संजय राऊत यांना जामीन मिळावा यासाठी त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत जोरदार फिल्डिंग लावत असल्याची चर्चा आहे.

Sanjay Raut
Sanjay Raut

Sunil Raut in Delhi: भारतीय जनता पक्षाला थेट भिडणारे शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांना जामीन मिळावा म्हणून शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी नुकतीच 'मातोश्री' निवासस्थानी जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर ते थेट दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळं चर्चेला उधाण आलं आहे.

पत्रा चाळ पुनर्विकासातील कथित घोटाळ्याच्या प्रकरणात ईडीनं संजय राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. जवळपास महिनाभरापासून ते ऑर्थर रोड तुरुंगात आहेत. अलीकडंच त्यांनी विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर न्यायालयानं ईडीला म्हणणं मांडण्यास सांगितलं आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं हालचाली सुरू केल्या आहेत. नुकतीच सुनील राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते दिल्लीला पोहोचले आहेत. संजय राऊत यांच्या सुटकेसाठी नेमकं काय करता येईल, याबाबत ते तिथं कायदेतज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याचं सूत्रांकडून समजतं.

भाजपशी तडजोड होणार?

सुनील राऊत हे दिल्लीत भाजपच्या काही नेत्यांची भेट घेणार असल्याचं बोललं जातं. संजय राऊत यांच्या सुटकेसाठी दोन्ही बाजूंमध्ये तडजोड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सध्या शिवसेना व भाजपमध्ये असलेली कटुता बघता हे सगळं प्रत्यक्षात येईल का, याविषयी साशंकता आहे. संजय राऊत यांचा भाजपला कडवा विरोध आहे. अटक करून घेण्याइतपत त्यांनी भाजपला विरोध केला आहे. सुटकेसाठी भाजपशी जुळवून घेणं त्यांना मान्य होईल का हाही प्रश्न आहे. दुसरीकडं, संजय राऊत यांच्या रडारवर राहिलेल्या भाजप नेत्यांनाही हे पटेल का? आताच्या परिस्थितीत संजय राऊत बाहेर आले तर ते भाजपला राजकीयदृष्ट्या परवडणार आहे का, यावरही बरंच काही अवलंबून असेल.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग