Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार ऐन रंगात आला आहे. या प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असतांना आता मुंबईत मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईत जोगेश्वरी येथे मंगळवारी रात्री पचार सुरू असतांना शिवसेना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना जोरदार मारहाण केली. या घटनेमुळे मोठा तणाव निर्माण झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईचया जोगेश्वरी पूर्व मतदार संघात शिदे गटाचे खासदार रवींद्र वायकर हे त्यांच्या काही कार्यकर्त्यांसोबत महिलांना काही वस्तूंचे वाटप करत असल्याची माहिती ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. ठाकरे गटाचे कार्यकर्ते मातोश्री क्लब येथे जात त्यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना याचा जाब विचारला.
यावेळी दोन्ही बाजूचे शिवसैनिक भिडले. त्यांनी एकमेकांना मारहाण केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांचे पथक व दंगलविरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मातोश्री क्लबबाहेर जमले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक केल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाने केला.
या घटनेची माहिती मिळताच ठाकरे गटाचे जोगेश्वरी पूर्वचे उमेदवार बाळा नर घटनास्थळी आले. यावेळी ते देखील या गोंधळात शिवसैनिकांबरोबर पुढे होते. मातोश्री क्लब इथे वायकरांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण सुरू केल्याचा आरोप करत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. या सोबतच अनिल परब हे देखील घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी शिंदे गट जबाबदार आहे असे म्हणत त्यांनी शिंदे गट पैसेवाटप, धान्यवाटप करून आचारसंहितेचा भंग करत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाला तक्रार केली असल्याचे परब म्हणाले.