मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ठाकरे आणि शिवसेना ही नावं न वापरता जगून दाखवा; उद्धव यांचं बंडखोरांना आव्हान

ठाकरे आणि शिवसेना ही नावं न वापरता जगून दाखवा; उद्धव यांचं बंडखोरांना आव्हान

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jun 24, 2022 03:02 PM IST

Uddhav Thackeray targets Eknath Shinde and Rebellions: शिवसेनेच्या विरोधात बंड करणारे एकनाथ शिंदे व त्यांना साथ देणाऱ्या बंडखोर आमदारांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जोरदार तोफ डागली.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray targets Eknath Shinde: शिवसेनेतील बंडाळीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता डॅमेज कंट्रोलला सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना उद्धव यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका केली. ‘शिवसेना व ठाकरे हे नाव न वापरता जगून दाखवा, वावरून दाखवा,’ असं आव्हानच त्यांनी बंडखोरांना दिलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याला उद्देशून केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांचा सूर अत्यंत संयमी होता. महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या वेळची परिस्थिती, अनपेक्षित आलेलं मुख्यमंत्रिपद याचा उहापोह करताना त्यांनी बंडखोरांना परतण्याचं आवाहन केलं होतं. मुख्यमंत्रिपद व पक्षप्रमुख पद सोडण्याची तयारीही दाखवली होती. मात्र, आज झालेल्या भाषणात त्यांनी मनातील सल बोलून दाखवला. 'मेलो तरी शिवसेना सोडणार नाही असं काही लोक म्हणत होते. तेच आता पळून गेले. शिवसेना फोडण्याचं पाप तुम्ही केलं आहे. झाडाची पानं, फुलं, फांद्या आणि फळं तुम्ही नेऊ शकता, पण मुळं नेऊ शकत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना ठणकावलं.

‘माझं मुख्यमंत्रिपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. जे सोडून गेले, त्यांचं मला वाईट का वाटावं? एकनाथ शिंदे यांना काय दिलं नव्हतं? नगरविकास मंत्री केलं. माझ्याकडची दोन खाती दिली. संजय राठोड यांच्यावर घाणेरडे आरोप होऊनही मी त्यांना सांभाळून घेतलं. विठ्ठल आणि बडव्यांवर बोलणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा मुलगा खासदार आहे, याकडंही उद्धव यांनी लक्ष वेधलं.

'आपलेच काही लोक शिवसेनेवर सोडण्यात आले आहेत. बाहेरच्या भाडोत्री लोकांनाही आपल्याविरुद्ध वापरलं जातंय. शिवसेनेच्या अस्तित्वावर बोलणाऱ्यांना निष्ठा काय असते हे दाखवावं लागेल. ठाकरे व शिवसेना ही नावं न वापरता जगून दाखवा, असं आव्हानही उद्धव यांनी दिलं. मी बरा होऊ नये म्हणून काही लोक देव पाण्यात घालून बसले होते, असं सूचक वक्तव्य उद्धव यांनी कोणाचं नाव न घेता केलं.

अफवांनाही दिलं उत्तर

एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे उद्धव ठाकरे असल्याची चर्चा घडवून आणली जात होती. त्यावरही उद्धव यांनी भाष्य केलं. 'आमदारांना फूस लावून मी सत्तानाट्य कशासाठी घडवेन? मला सत्तेचा लोभ नाही. वर्षा बंगला सोडून मी मातोश्रीवर आलो आहे, असं त्यांनी अफवा पसरवणाऱ्यांना सुनावलं.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या