मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kolhapur Politics : संजय मंडलिकांविरोधात शिवसेनेचं आंदोलन; शिवसैनिकांच्या आक्षेपार्ह घोषणा!

Kolhapur Politics : संजय मंडलिकांविरोधात शिवसेनेचं आंदोलन; शिवसैनिकांच्या आक्षेपार्ह घोषणा!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 11, 2022 02:23 PM IST

MP Sanjay Mandlik : कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांच्याविरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवारांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आलं आहे.

Shivsena Against MP Sanjay Mandlik
Shivsena Against MP Sanjay Mandlik (HT)

Shivsena Against MP Sanjay Mandlik : कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिकांविरोधात आज कोल्हापूरात जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत मंडलिक यांच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न केला. खासदार मंडलिक यांनी शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानं संतापलेल्या शिवसैनिकांनी हे आंदोलन केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच शिवसैनिकांनी शिंदे गटाचे बंडखोर खासदार धैर्यशिल माने यांच्या घरावरही आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी संजय मंडलिकांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्यानं त्याची राज्यभर चर्चा होत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे दोन खासदार निवडून आले होते, परंतु एकनाथ शिंदेंनी पक्षात बंड केल्यानंतर मंडलिक आणि माने या दोन्ही खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता.

शिवसैनिकांच्या आक्षेपार्ह घोषणा...

शिवसेनेत बंड झाल्यानंतर त्याविरोधात कोल्हापूरात पहिला मोर्चा काढताना खासदार मंडलिक यांनी राजेश क्षीरसागर यांच्यावर टीका करताना त्यांना बेन्टेक्स नेते म्हटलं होतं. त्यानंतर आता शिवसैनिकांनी कोल्हापूरात मोर्चा काढताना 'गद्दार खासदार' अशा घोषणा देताना 'बेन्टेक्स सोनं घातलेले मंडलिक' अशा आशयाचे पोस्टर झळकावण्यात आले आहे. त्यामुळं सातत्यानं भूमिका बदलणाऱ्या मंडलिकांविरोधात शिवसेना चांगली आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

यावेळी आंदोलनात बोलताना काही शिवसैनिकांनी पुढच्या लोकसभा निवडणुकीत मंडलिकांचा दोन लाख मतांनी पराभव करू, असा इशाराच दिला आहे तर मंडलिक आता गद्दार झाले आहेत, त्यांनी आता राजीनामा द्यावा आणि नंतर निवडून येऊन दाखवावं, असं आव्हानही शिवसैनिकांनी दिलं आहे.

शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर शिवसैनिकांना स्पष्टीकरण देणार नसल्याचं मंडलिक म्हणाले होते, त्याला शिवसैनिकांनी उत्तर देताना म्हटलंय की, मंडलिक हे शिवसैनिकांच्या जीवावर निवडून आले आहेत, ज्यावेळी ते निवडणुकीत उभे होते, तेव्हा त्यांना प्रशासकीय यंत्रणेनं निवडून आणलं का?, असा सवालही शिवसैनिकांनी विचारला आहे.

याशिवाय शिवसैनिकांनी या आंदोलनात बेन्टेक्स आणि गद्दार खासदार अशा आशयाचे पोस्टरही झळकावले आहेत. शिवसेनेत जेव्हा बंड झालं होतं तेव्हा मंडलिकांनी राजेश क्षीरसागरांवर बेन्टेक्स नेते अशी टीका केली होती परंतु आता तेच बेन्टेक्स नेते झाल्याची टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या