Gadchiroli Crime News Marathi : शिवसेनेवरील वर्चस्वासाठी शिंदे आणि ठाकरे गटात संघर्ष पेटलेला असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात युवती सेनेच्या प्रमुखाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राहत सय्यद असं महिला शिवसैनिकाचं नाव असून तिच्या पतीनेच तिची हत्या केल्याचं पोलीस तपासातून उघड झालं आहे. त्यानंतर आता गडचिरोली पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली असून घटनेचा तपास सुरू केला आहे. ताहेमिम शेख असं आरोपी पतीचं नाव आहे. त्यामुळं आता या घटनेमुळं राज्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील शिवसेनेच्या युवती सेनेच्या प्रमुख राहत सय्यद यांची त्यांचे पती ताहेमिम सय्यद याने धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली आहे. मध्यरात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी ताहेमिमने तातडीने पोलीस ठाणे गाठत गुन्ह्याची कबुली दिली आहे. ताहेमिम हा राहत सय्यद यांच्या चारित्र्यावर संशय घेत तिला शिवीगाळ करत होता. त्यातून दोघांमध्ये सतत खटके उडत होते. परंतु मध्यरात्री झालेल्या वादातून ताहेमिमने राहत सय्यद यांची हत्या केल्याची माहिती गडचिरोली पोलिसांकडून देण्यात आली आहे.
शिवसेनेच्या पदाधिकारी असलेल्या राहत सय्यद या निष्ठावान शिवसैनिक होत्या. त्यांचे वडील देखील शिवसेनेत काम करत होते. लग्नानंतर देखील त्यांनी शिवसेनेच्या अनेक आंदोलनांमध्ये भाग घेत विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलं होतं. मृत राहत सय्यद यांचा आरोपी पती ताहेमिम याला काही दिवसांपूर्वीच रायपुरमध्ये छत्तीसगड पोलिसांनी हरणांची शिंगे विक्री केल्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर आता आरोपी ताहेमिमने शिवसैनिक राहत सय्यद यांची हत्या केल्याने गडचिरोली जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.