Bhavana Gawali Get Summons By IT: शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांना आयकर विभागाने आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. गवळी यांच्या उत्कर्ष प्रतिष्ठा संस्थेत १९ कोटांचा गैरव्यवहार झाल्याचे आयकर विभागाने आपल्या नोटीसमध्ये नमूद केले. आयकर विभागाच्या नोटीसाला आज (५ जानेवारी २०२३) उत्तर द्यावे लागणार आहे. यापूर्वी २०२२ मध्ये इडीने भावना गवळी यांना गैरव्यवहारप्रकरणी तीन नोटीसा पाठवल्या होत्या.
गवळी यांच्या संस्थेचे संचालक सईद खान यांना ईडीने अटक केली होती. सईद खान यांनी संस्थेला बेकायदेशीरित्या कंपनीमध्ये रुपांतरीत करण्यासाठी मध्यस्थी केली. यासाठी गैरव्यवहार झाला, ज्यात १९ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. याशिवाय, ईडीने भावना गवळी यांच्यावर सात कोटी रुपयांच्या रोख रक्कमेचादेखील गैरवापर झाल्याचा ठपका ठेवला होता.
भावना गवळी यांनी २७ नोव्हेबर १९९८ रोजी महिला आणि तरुणींना प्रशिक्षित करण्यासाठी प्रतिष्ठानची स्थापना केली. त्यावेळी भावना गवळी अध्यक्ष होत्या. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाशीमच्या रिसोड येथील आयुर्वेद महाविद्यालयासह देगाव येथील फार्मसी संस्था, सरकारी शाळा, शिरपूरमध्ये कनिष्ठ महाविद्यालय, वरीष्ठ महाविद्यालय, प्राथमिक शाळा तसेच वाशीम आणि यवतमाळ जन शिक्षण संस्था चालवण्यात येतात.
दरम्यान, भावना गवळी यांना आयकर विभागाने नोटीस बजावल्यावरून पोहरादेवी धर्मपीठाचे महंत सुनील महाराज यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपला भावना गवळी या लोकसभा उमेदवार म्हणून नको आहेत, यामुळेच त्यांना आयकर विभागाची नोटीस मिळाली, असे सुनील महाराज म्हणाले. तसेच भावना गवळी यांना यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघात प्रचंड विरोध आहे. हे भाजपच्या लक्षात आले आहे. या वेळेस पोहरादेवीचे शक्तीपीठ व बंजारा समाजपण भावना गवळी यांच्या मागे उभा राहणार नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.