Dharavi Redevelopment : धारावी पुनर्विकास प्रकल्प पुन्हा एकदाचर्चेत आला आहे. काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधानंतर आता सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाच्या आमदारानेही धारावी पुनवर्सनाला विरोध केला आहे. कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh kudalkar) यांनी धारावी पुनर्वसनाला जाहीरपणे विरोध दर्शवत याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मंगेश कुडाळकर यांनी विरोध केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत काय निर्णय घेतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आमदार मंगेश कुडाळकर यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला कुर्ला डेअरीमधील ८.५ हेक्टरचा भूखंड धारावीतील अपात्र झोपडपट्टी धारकांसाठी घरे बांधण्यासाठी देण्यास विरोध केला आहे. हा भूखंड प्राधिकरणाला देण्याची राज्य सरकारची योजना आहे. मात्र आता सत्ताधारी गटातूनच याला विरोध होत आहे. त्यातच मुंबई काँग्रेसच्या प्रमुख वर्षा गायकवाड यांनी सरकारची योजना यशस्वी होऊ देणार नसल्याचे म्हटले आहे.
धारावीतील हजारो प्रकल्पबाधितांचे कुर्ल्याच्या साडे आठ एकर जागेवर पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला आहे. पण राज्य सरकारच्या या निर्णयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच पक्षाच्या आमदाराचा विरोध आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा आधीपासूनच या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे.
कुर्ला पूर्व येथील मातृदुग्धशाळा येथील जागेवर धारावी पुनर्वसन प्रकल्पातील झोपडीधारकांना सरकार घरे उपलब्ध करून देणार आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी एकत्र येऊया, अशी पोस्ट मंगेश कुडाळकर यांनी सोशल मिडियावर केली होती. त्यानंतर त्यांना आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याबाबत आमदार मंगेश कुडाळकर यांनी राज्याचे गृहनिर्माण अपर मुख्य सचिव वल्सा नायर-सिंह यांना पत्र पाठवत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नेहरू नगर कुर्ला पूर्व येथील मातृदुग्धशाळेच्या जागेवर अत्याधुनिक सर्व सुविधायुक्त असं संकुल तसेच उर्वरित जागेवर वृक्षांचे संवर्धन व्हावे. यादृष्टीने बोटॅनिकल गार्डन उभारण्यासाठी दुग्ध विकास विभागाचा १० जून २०२४ शासन निर्णय रद्द करण्यात यावा”
“उपरोक्त विषयान्वये गेली अनेक वर्षे माझ्या विभानसभा क्षेत्रातील नेहरू नगर कुर्ता पूर्व येथील मातृदुग्धशाळेच्या जागेवर अत्याधुनिक सर्व सुविधायुक्त असे क्रीडा संकुल तसेच उर्वरित जागेवर वृक्षांचे संवर्धन होण्याकरिता मी सातत्याने पाठ पुरावा करीत आहे. संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने वारंवार मी स्थानिक नागरिकांच्या मागणीच्या अनुषंगाने पत्र व्यवहार करत आहे. तरीही दुग्ध विकास विभागाने ८.५ हेक्टर जमीन धारावी पुनर्वसन प्रकल्प झोपडपट्टी प्राधिकरणास हस्तांतरित करण्याबाबत शासन निर्णय झाला आहे”, असं मंगेश कुडाळकर म्हणाले.
या ठिकाणी असे क्रीडा संकुल तसेच उर्वरित जागेवर वृक्षांचे संवर्धन होणे ही स्थानिकांची मागणी आहे. त्यामुळे दुग्ध विकास विभागाचा निर्णय तत्काळ रद्दकरून येथे क्रीडासंकुल,तसेच उर्वरित जागेवर बोटॅनिक गार्डन उभारावे,अशी मागणी मंगेश कुडाळकर यांनी केली आहे.