मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MLA Disqualification Result : ठाकरे गटाला मोठा धक्का; एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना, १६ आमदारही पात्र

MLA Disqualification Result : ठाकरे गटाला मोठा धक्का; एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना, १६ आमदारही पात्र

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 10, 2024 07:49 PM IST

Shiv Sena Mla Disqualification Result : आमदार अपात्रता निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी आजा खरी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचे म्हटले असून १६ आमदारांनाही दिलासा देत त्यांना पात्र ठरवलं आहे.

MLA Disqualification Result
MLA Disqualification Result

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल अखेर समोर आला असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. सुरुवातीला शिवसेना आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचा? यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आहे. शिवसेना पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकार मलाच असल्याचे सांगत नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांना बहाल केला आहे. भरत गोगावले यांची प्रतोदपदी निवड योग्य असून त्यांचा व्हीप वैध असल्याचे तसेच १६ आमदारही केवळ बैठकीला हजर नाहीत म्हणून अपात्र करता येणार नसल्याचा मोठा निर्णय राहूल नार्वेकर यांनी दिला आहे.

विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये ठाकरे व शिंदे गटातील आमदारांच्या उपस्थितीत या निकालाचे वाचन करण्यात आले. १२०० पानांच्या या निकालपत्रातील महत्वाच्या मुद्द्याचे राहुल नार्वेकर यांनी वाचन केले. तसेच निकालाची प्रत सर्वांना देण्यात येणार असल्याचे म्हणाले.

नार्वेकरांनी निकालाचे वाचन सुरू करताच ठाकरे गटाला धक्का देत २०१८ सालची घटना ग्राह्य धरता येत नसल्याचे जाहीर केले. २०१८ सालच्या घटनेची नोंद निवडणूक आयोगाकडे नाही. निवडणूक आयोगाकडे असलेली प्रत ही शिवसेनेची १९९९ सालची घटना असून तीच ग्राह्य धरली जाईल. २०१८ सालची घटना ग्राह्य धरा ही ठाकरे गटाची मागणी अमान्य करण्यात आली.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे मत हे पक्षाचे मत असू शकत नाही. त्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणी सोबत चर्चा करूनच निर्णय घेणे अपेक्षित आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्ष प्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंवर केलेली कारवाई मान्य करता येणार नाही, असं नार्वेकर म्हणाले. 

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे गटाकडे असलेली शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. या निर्णयाचा आधार घेऊन मी निकाल देत आहे. २०१८ मध्ये पक्षात निवडणूक न घेता नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामुळे २०१८ मधील बदल ग्राह्य धरता येत नाही. कोणताही निर्णय पक्षप्रमुख नव्हे तर राष्ट्रीय कार्यकारणी घेणार व तोच फैसला अंतिम असल्याचं सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाचा दावा फेटाळला. तसेच उद्धव ठाकरेंना  एकनाथ शिंदेंची विधीमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्याचा अधिकार नसल्याचेही राहुल नार्वेकरांनी म्हटलं.

WhatsApp channel