शिवसेना एकनाथ शिंद गटाचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचीकथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकरणात खांडे यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात आली. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत कुंडलिक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.
शिवसेना सचिव संजय मोरे यांनी पत्रक काढून खांडे यांच्यावर कारवाई केली आहे. शिस्तभंग समितीच्या शिफारशीनुसार आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने हकालपट्टी करण्यात आल्याचे या पत्रकात म्हटले आहे.
कुंडलिक खांडे यांची एक कथित ऑडिओ क्लिप काही दिवसांपासून व्हायरल झाली आहे. यामध्ये आपण पंकजा मुंडेंच्या विरोधात काम केलं असून बजरंग बाप्पांना मदत केली,असं बोलताना यात ऐकू येत आहे.
यासोबतच राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करून त्यांची गाडी फोडण्याबाबतचे वक्तव्य केल्याचंही यात ऐकू येत आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. कुंडलिक खांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण बीड जिल्ह्यात उमटल्याचं पाहायला मिळालं. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर परळी आणि बीड पोलिसात गुन्हे देखील दाखल झाले होते.
कुंडलिक खांडे यांच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना लोकसभा निवडणुकीत मदत केल्याची कबुली या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे. दिल्याचा संवाद आहे. लोकसभा निवडणूक निकालापूर्वीची कथित ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे.
दरम्यान, कुंडलिक खांडे यांना पोलिसांनी आणखी एक खटल्यात अटक केली आहे. शिंदे गटाचे उपाध्यक्ष माऊली खांडे यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी कुंडलिक खांडे यांना अटक केली आहे. पोलिसांनी अहमदनगर महामार्गावरील जामखेड येथून त्यांना अटक केली आहे. काही महिन्यापूर्वी दाखल गुन्ह्यात त्यांना आता अटक करण्यात आली आहे. बीड ग्रामीण पोलिसात ३०७ चा गुन्हा दाखल झाला होता.