Eknath Shinde : लोकांना वाटतं की मीच मुख्यमंत्री व्हायला हवं! एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उडवून दिली खळबळ
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : लोकांना वाटतं की मीच मुख्यमंत्री व्हायला हवं! एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उडवून दिली खळबळ

Eknath Shinde : लोकांना वाटतं की मीच मुख्यमंत्री व्हायला हवं! एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उडवून दिली खळबळ

Dec 02, 2024 11:44 AM IST

Maharashtra Next CM: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवड्यापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी नव्या सरकारची स्थापना होऊ शकलेली नाही. अशातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

लोकांना वाटतं की मीच मुख्यमंत्री व्हायला हवं- एकनाथ शिंदे
लोकांना वाटतं की मीच मुख्यमंत्री व्हायला हवं- एकनाथ शिंदे (ANI)

Eknath Shinde News : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून नाराज असलेले व दिल्लीतील बैठक सत्र आटोपल्यानंतर अचानक साताऱ्यातील गावी जाऊन बसलेले एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. मीच मुख्यमंत्रीपदी राहायला हवे असे लोकांना वाटते,’ असे शिंदे यांनी म्हटले आहे. सरकार स्थापनेचा मार्ग वाटतो तितका सोपा नसल्याचं त्यांच्या या वक्तव्यामुळे स्पष्ट झाले आहे.

एकनाथ शिंदे यांनी रविवारी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, ‘मी जनतेचा मुख्यमंत्री होतो. मी फक्त मुख्यमंत्री नाही, तर सामान्य माणूस आहे, असेही मी म्हणायचो. एक सामान्य माणूस म्हणून मी लोकांच्या अडचणी आणि वेदना समजून घेतल्या आणि त्या कमी करण्याचा प्रयत्न केला. मी एक सामान्य माणूस म्हणून काम केल्यामुळे मीच मुख्यमंत्री व्हावा असे लोकांना वाटणे स्वाभाविक आहे.'

रविवारी शिंदे हे आपल्या मूळ गावी दरे येथून ठाण्याकडे रवाना झाले. सत्तास्थापनेच्या चर्चेवर ते समाधानी नव्हते आणि म्हणूनच ते गावी निघून गेले, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, परतल्यानंतर त्यांनी स्वत: परिस्थिती स्पष्ट केली. तब्येत बरी नसल्यामुळे गावी आलो, असे ते सांगितले. तब्येतीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, ते आता बरे आहेत आणि विश्रांती घेण्यासाठी आपल्या मूळ गावी आले आहेत. 'मी नेहमी माझ्या गावी येतो. गेल्या आठवड्यातच मी माझी भूमिका स्पष्ट केली होती, त्यात गोंधळून जाण्यासारखे काही नाही. जनतेला हवे ते सरकार आम्ही देऊ. गेल्या अडीच वर्षांत आमच्या कामाच्या मोबदल्यात लोकांनी निवडून दिले. आता आमची जबाबदारी वाढली आहे.

राज्यात नवे सरकार स्थापन करण्याच्या भाजपच्या निर्णयाला शिवसेना पाठिंबा देईल, असे शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी घ्यायचा असून ते घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने पीटीआयला सांगितले की, महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपच्या नव्या विधिमंडळ पक्षाची बैठक २ किंवा ३ डिसेंबर रोजी होणार आहे. नव्या सरकारमध्ये त्यांचे चिरंजीव आणि लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री केले जाणार का? शिवसेनेने गृहखात्यावर दावा केला आहे का, असे विचारले असता एकनाथ शिंदे यांनी चर्चा सुरू आहे, असे म्हटले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर