Satish Pradhan Passed Away: शिवसेना नेते व ठाणे महानगरपालिकेचे शिवसेनेचे प्रथम महापौर सतीश प्रधान (वय ८४) यांचे रविवारी दुपारी २ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. त्यांची अंत्ययात्रा सोमवारी सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानावरून निघणार आहे. सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासात तसेच शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक मजबूतीसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनामुळे शिवसेना व ठाणे शहराचे मोठे नुकसान झाले आहे.
सतीश प्रधान यांची तब्येत काही दिवसांपासून खालावली होती. तसेच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते. ठाणे येथील गोडबोले हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज दुपारी त्यांचे निधन झाले आहे. सतीश प्रधान यांनी ठाण्यात अनेक विकासकामे केली आहेत. ज्ञानसाधना महाविद्यालय १९८० साली त्यांनीच स्थापन केले. ठाणे शहरात महापौर मॅरथॉन त्यांनीच सुरू केली होती. त्यांच्याकडे स्मार्ट सिटीची दूरदृष्टी होती.
सतीश प्रधान यांचा जन्म २९ ऑगस्ट १९४० रोजी झाला होता. ते ठाणे शहराचे शिवसेनेचे पहिले महापौर होते. राज्यसभेतील शिवसेना पक्षाचे नेते होते.
ज्ञानसाधना महाविद्यालयाचे सध्या मानद अध्यक्ष होते. सतीश प्रधान यांच्या पश्चात त्यांचा मुलगा कमलेश प्रधान, सून डॉ. मानसी प्रधान, कन्या, जावई आणि दोन नाती असा त्यांचा परिवार आहे. सतीश प्रधान यांच्या जाण्याने कुटुंबीयांमध्ये तसेच ठाण्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
संबंधित बातम्या