मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ambadas Danve: चौफेर आव्हानांचा सामना करणाऱ्या शिवसेनेला बऱ्याच दिवसांनंतर मोठा दिलासा

Ambadas Danve: चौफेर आव्हानांचा सामना करणाऱ्या शिवसेनेला बऱ्याच दिवसांनंतर मोठा दिलासा

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 10, 2022 11:14 AM IST

Relief to Shiv Sena: गेल्या काही दिवसांपासून अनेक अडचणींचा सामना करणाऱ्या शिवसेनेला पहिल्यांदाचा मोठा दिलासा मिळाला आहे.

Uddhav Thackeray - Ambadas Danve
Uddhav Thackeray - Ambadas Danve

एकनाथ शिंदे यांचं बंड… त्यानंतर गेलेली राज्यातील सत्ता… पक्षात पडलेली उभी फूट आणि न्यायालयीन लढाई… अशा कात्रीत सापडलेल्या शिवसेनेला बऱ्याच दिवसानंतर पहिला दिलासा मिळाला आहे. विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेतेपद अखेर शिवसेनेला मिळालं आहे. विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे यांच्या नावाला मान्यता देण्यात आली आहे.

शिवसेनेतील बंडाळीनंतर राज्यातील सत्ता गेल्यामुळं विरोधी बाकांवर बसण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. त्यामुळं विरोधी पक्ष नेते कोणाचा हा प्रश्न महाविकास आघाडीत चर्चेत होता. विधानसभेत संख्याबळाच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेसला संधी मिळाली. विधान परिषदेच्या विरोधी पदासाठी काँग्रेसही आग्रही होती. मात्र, संख्याबळ जास्त असल्यानं शिवसेनेला संधी मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: विधान परिषदेचे सदस्य आहेत. मात्र, ते सदस्यत्व सोडणार असल्यानं शिवसेनेच्या वतीनं अंबादास दानवे यांच्या नावाची लेखी शिफारस या पदासाठी करण्यात आली होती.

विधान परिषदेत शिवसेनेचे १२, राष्ट्रवादीचे १० तर काँग्रेसचे १० सदस्य आहेत. सर्वात मोठा पक्ष म्हणून विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचा सदस्य नेमावा असं पत्र उपसभापती नीलम गोऱ्हे यांना शिवसेनेकडून देण्यात आलं होतं. सोमवार, ८ ऑगस्ट रोजी शिवसेना उपनेते अरविंद सावंत यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना हे पत्र सुपूर्द केलं होतं. त्यानंतर काल दुपारी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची निवड करण्यात आल्याचं जाहीर केलं. याविषयीचे राजपत्र रात्री प्रसिद्ध करण्यात आलं. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांचं अभिनंदन केलं आहे. 

IPL_Entry_Point