मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kothrud News: पुण्यातील वाहतूक कोंडीचा आदित्य ठाकरेंना फटका; चंद्रकांत मोकाटेंची भेट घेत आखली रणनीती

Kothrud News: पुण्यातील वाहतूक कोंडीचा आदित्य ठाकरेंना फटका; चंद्रकांत मोकाटेंची भेट घेत आखली रणनीती

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 01, 2022 10:37 AM IST

Aditya Thackeray Pune Visit : दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमिवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांना शहरातील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

Aditya Thackeray On Pune City Visit
Aditya Thackeray On Pune City Visit (HT)

Aditya Thackeray On Pune City Visit : शिवसेना आणि शिंदे गटानं दसरा मेळाव्याचा टीझर जारी केला आहे. त्यामुळं आता दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्यात कोण काय बोलणार किंवा कोणती भूमिका घेणार, याबाबत अनेकांना उत्सुकता निर्माण झालेली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात होणार असून शिंदे गटाचा मेळावा बीकेसीवर होणार आहे. त्यातच आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमिवर आदित्य ठाकरे पुण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधून दसरा मेळाव्याबाबत रणनिती आखली आहे.

आदित्य ठाकरेंनी पुण्यात माजी आमदार चंद्रकांत मोकाटेंच्या नवरात्र मंडळाचा भेट दिली आहे. त्यामुळं आता आदित्य ठाकरेंनी भाजप आणि चंद्रकांत पाटलांच्या बालेकिल्याला सुरुंग लावण्याचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा रंगली आहे. कोथरूड हा २०१४ पर्यंत शिवसेनेचा बालेकिल्ला होता. त्यानंतर सलग दोनदा तिथून भाजपच्या उमेदवाराचा विजय झालेला आहे. त्यामुळं आता चंद्रकांत मोकाटेंची भेट घेऊन आदित्य ठाकरेंनी बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी रणनीती आखल्याचं बोललं जात आहे.

आदित्य ठाकरेही अडकले वाहतूक कोंडीत...

नवरात्रीच्या कार्यक्रमासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे मुंबईहून पुण्याला येत असताना त्यांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं. कारण त्यांच्या वाहनांचा ताफा वाकडेवाडीत तब्बल वीस ते पंचवीस मिनिटं वाहतूक कोंडीत अडकला होता. ते वाकडेवाडीतून सारसबागेच्या दिशेने जात होते. त्यावेळी मुसळधार पाऊसामुळं वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळं आदित्य ठाकरेंना पुढील कार्यक्रमासाठी फार उशीर झाला होता.

आदित्य ठाकरेंनी पुणे दौऱ्यात शहरातील विविध नवरात्री मंडळांना भेटी दिल्या आहेत. त्यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचा दौरा करणार असल्याचं म्हणाले. त्यामुळं आता पुण्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे.

WhatsApp channel