मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  एकनाथ शिंदेंच्या गद्दारीची दखल ३३ देशांनी घेतली; आदित्य ठाकरेंची जहरी टीका

एकनाथ शिंदेंच्या गद्दारीची दखल ३३ देशांनी घेतली; आदित्य ठाकरेंची जहरी टीका

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 07, 2022 11:10 AM IST

Aditya Thackeray: शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर जोरदार निशाणा साधला आहे.

Aditya Thackeray Criticized CM Eknath Shinde
Aditya Thackeray Criticized CM Eknath Shinde (HT_PRINT)

Aditya Thackeray Criticized CM Eknath Shinde : जेव्हा शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह बंड केलं होतं, त्यानंतर या बंडाची ३३ देशांनी दखल घेतल्याचा दावा सातत्यानं शिंदे गटाकडून करण्यात येत होता. यावरूनच आता शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी शिंगे गटासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवरही टिकास्त्र सोडलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाची दखल ३३ देशांनी घेतल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ३३ देशांनी तुमच्या बंडखोरीची नाही तर गद्दारीची नोंद घेतली आहे, ५० चा बार होता, तो आधीच फुटलेला असून ज्या लोकांना माहिमनं मोठं केलं तेच लोक फुटल्यानं वाईट वाटतं, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे.

मुंबईतील माहिम भागात आयोजिक एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे बोलत होते, ते पुढे म्हणाले की, काही लोकांना गरजेपेक्षा जास्त दिलं त्यांना अपचन होतं, म्हणून ते हाजमोला खाण्यासाठी तिकडे गेल्याची टीका त्यांनी स्थानिक बंडखोर आमदार सदा सरवणकर यांच्यावर केली आहे. उद्धव ठाकरेंसारख्या चांगल्या माणसाच्या पाठित या बंडखोरांनी खंजीर खुपसला असून आता शिवसेना नवीन लोकांना संधी देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी असताना कोरोनाकाळात चांगलं काम झालं, कधीही राज्यात जातीयवाद झाल्याचं पाहायला मिळालं नाही. महाराष्ट्र पुढं जातोय असं दिसताच विरोधकांनी अडवाअडवीचं राजकारण सुरू करायला सुरुवात केली, त्यामुळं आता शिवसेनेतून गेलेले लोक हे बंडखोर नसून गद्दार असल्याची टीकाही त्यांनी शिंदे गटावर केली आहे.

राज्यपालांवरही केली टीका...

याआधी राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यानंतर त्यांनी मुंबईबाबत केलेलं वक्तव्य मी बघितलं, पी सी अलेक्झांडर यांच्यापासून आतापर्यंत अनेक राज्यपाल झाले पण असे राज्यपाल बघितले नसल्याची टीका त्यांनी कोश्यारींवर केली आहे. ठाकरेंच्या शासनकाळात मुंबईचा विकास होत असल्याचं बघुन भाजपच्या पोटात दुखत होतं, महाराष्ट्राचा विकास आणि यशस्वी वाटचाल शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांनी रोखल्याची टीकाही आदित्य ठाकरेंनी केली आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या