मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar: दसरा मेळाव्याच्या वादावर शरद पवार बोलले; ठाकरे, शिंदेंना दिला महत्त्वाचा सल्ला

Sharad Pawar: दसरा मेळाव्याच्या वादावर शरद पवार बोलले; ठाकरे, शिंदेंना दिला महत्त्वाचा सल्ला

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Oct 03, 2022 03:25 PM IST

Sharad Pawar on Dasara Melava: दसरा मेळाव्यावरून शिवसेनेच्या दोन गटांत सुरू असलेल्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar

Sharad Pawar on Shiv Sena's Dasara Melava: शिवसेनेच्या दोन गटांच्या दसरा मेळाव्याच्या आधीच दोन्ही बाजूंकडून शाब्दिक ठिणग्या उडत आहेत. त्यामुळं प्रत्यक्ष मेळावे पार पडल्यानंतर व त्यातील भाषणांनंतर नेमकं काय होणार, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर भाष्य करताना शिवसेनेच्या दोन्ही गटांना सबुरीचा सल्ला दिला आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर भाष्य केलं. 'दुर्दैवानं एका पक्षाचे दोन भाग झाले. त्यातून स्पर्धा सुरू झाली. ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर आता दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पक्षाची सूत्रं हाती घेण्याचे प्रयत्न आहेत. अशा गोष्टी होत असतात. यात काही नवीन नाही. पण त्याला एक मर्यादा ठेवली पाहिजे. ती मर्यादा ओलांडून काही होत असेल तर राज्याच्या दृष्टीनं ते बरोबर नाही. राज्यातील जे जबाबदार लोक आहेत, त्यांनी हे वातावरण दुरुस्त करण्यासाठी पावलं टाकली पाहिजेत, असं ते म्हणाले. 

'राजकीय वातावरण गढून होऊ न देण्याची जबाबदारी आमच्यासारख्या ज्येष्ठ लोकांची आहेच, पण त्याहीपेक्षा राज्याच्या प्रमुखांवर अधिक जबाबदारी आहे. कारण, ते केवळ एखाद्या गटाचे प्रमुख नसून १४ कोटी लोकांचेही प्रमुख आहेत. दसरा मेळाव्यातून जी काही मांडणी होईल, त्यातून कटुता वाढणार नाही, अशी अपेक्षाही शरद पवार यांनी व्यक्त केली.

शिवसेनेच्या मेळाव्यात राष्ट्रवादी?

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस छुपी ताकद देणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचा आरोपच भाजपच्या काही नेत्यांनी केला होता. त्यावरही पवार यांनी भाष्य केलं. 'शिवसेनेच्या दसरा मेळाव्याशी आमचा काही संबंध नाही. हे त्यांचे कार्यक्रम आहेत. त्यात अन्य पक्षांनी यायचं काही कारण नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

WhatsApp channel