खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना विशेष ट्रीटमेंट देताना लीलावती रुग्णालय (Lilavati Hospital) प्रशासनानं अनेक नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप करत शिवसेनेनं (Shiv Sena) रुग्णालयाच्या विरोधात पोलिसांत धाव घेतली आहे. या प्रकरणी वांद्रे पश्चिम पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जामिनावर सुटलेल्या खासदार नवनीत राणा उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. तिथं त्यांच्यावर झालेल्या चाचण्या व उपचारांच्या बातम्या फोटो व व्हिडिओसह मीडियामध्ये झळकत होत्या. रुग्णालयाच्या एमआरआय कक्षातील फोटो देखील व्हायरल झाले होते. त्यास शिवसेनेनं तीव्र आक्षेप घेतला आहे.
शिवसेनेच्या विधान परिषद सदस्य प्रा. डॉ. मनीषा कायंदे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी नगरसेवक अनिल कोकीळ आणि युवा सेनेचे राहुल कनाल यांनी मंगळवारी लीलावती रुग्णालयात जाऊन प्रशासनाला याबाबत जाब विचारला होता. त्यानंतर आज रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात रीतसर तक्रार देण्यात आली आहे.
'रुग्णालयाच्या छापील नियमावलीनुसार रुग्णालयात फोटोग्राफी करण्यास परवानगी नाही. असं असताना नवनीत राणा यांची एमआरआय चाचणी सुरू असताना त्याचे फोटो समाजमाध्यमात व्हायरल झाले. एमआरआय कक्षात मोबाइल घेऊन जाण्यास व फोटो काढण्यास परवानगी दिली गेली, हे यावरून दिसतं. त्यामुळं रुग्णालयाच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे, असं शिवसेनेनं तक्रारीत म्हटलं आहे.
'राणा यांचे हे फोटो कोणी काढले. त्याची चौकशी होऊन दोषीवर कारवाई व्हावी, एमआरआय कक्षाच्या मागे ऑक्सिजन प्लाण्ट आहे. काही दुर्घटना घडली असती तर रुग्णालयाची सुरक्षा धोक्यात आली असती. त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे.
‘खासदार राणा यांच्यासोबत असणारे बंदूकधारी सुरक्षा रक्षक रुग्णालय आवारात शस्त्रासह फिरताना दिसत होते. रुग्णालयाच्या नियमावलीनुसार शस्त्र घेऊन रुग्णालय आवारात प्रवेश दिला जात नाही. मग हे अंगरक्षक बंदूक घेऊन एम आर आय कक्षात वावरत होते का? याची सीसीटीव्ही फुटेज बघून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही शिवसेनेनं पोलिसांकडं केली आहे. 'या सर्व गंभीर घटना घडत असताना रुग्णालय प्रशासन नेमकं काय करत होतं याची चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेना शिष्टमंडळानं पोलिसांकडे केली आहे.
संबंधित बातम्या