मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray: ‘अडीच वर्षांपूर्वी भाजपनं शब्द पाळला असता तर ही वेळच आली नसती’

Uddhav Thackeray: ‘अडीच वर्षांपूर्वी भाजपनं शब्द पाळला असता तर ही वेळच आली नसती’

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jul 01, 2022 03:04 PM IST

Uddhav Thackeray questions BJP: महाविकास आघाडीची राज्यातील सत्ता घालवूनही आपला मुख्यमंत्री बसवू न शकलेल्या भाजपला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खडे बोल सुनावले आहेत.

Amit Shah - Uddhav Thackeray
Amit Shah - Uddhav Thackeray

Shiv Sena Chief Uddhav Thackeray attacks BJP: शिवसेनेतील बंडाला अप्रत्यक्ष ताकद देऊन बंडखोरांच्या मदतीनं राज्यात नवं सरकार स्थापन करणाऱ्या भारतीय जनता पक्षावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. ‘अडीच वर्षांपूर्वी अमित शहा यांनी मला दिलेला शब्द पाळला असता तर आज ही वेळ आलीच नसती. महाविकास आघाडीचा सुद्धा जन्म झाला नसता,’ असं उद्धव ठाकरे यांनी सुनावलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर व नव्या सरकारच्या कॅबिनेट बैठकीत काही निर्णय झाल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. ते काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. उद्धव ठाकरे यांनी केवळ तीन मुद्द्यांना स्पर्श केला. आताच्या सगळ्या परिस्थितीला कारणीभूत असलेल्या भाजपवर त्यांनी तोंडसुख घेतलं.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देऊन भाजप आता बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केल्याचा प्रचार करत आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. 'पाठीत वार करून शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे. मात्र, राज्यातील जनता सगळं पाहत आहे. अडीच वर्षांपूर्वी आम्ही हाच मुद्दा भाजपसमोर मांडला होता. अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री व अडीच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री, असा हा प्रस्ताव होता. मात्र, त्यावेळी शब्द पाळला गेला नाही. तसं झालं असतं तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता. शिवसेना व भाजपला सन्मानानं मुख्यमंत्रिपद मिळालं असतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘ज्या पदासाठी भाजपनं शब्द मोडला, त्यांचा मुख्यमंत्री आजही बसू शकलेला नाही. यात भाजपच्या मतदारांना किंवा त्यांना मानणाऱ्या लोकांना नेमका काय आनंद झाला असेल हे त्यांचं त्यांना माहीत. तेच करायचं होतं तर तेव्हा भाजपनं नकार का दिला?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ‘आता बसवलेला मुख्यमंत्री हा शिवसेनेचा नाही. शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊच शकत नाही’, असंही त्यांनी ठणकावलं.

IPL_Entry_Point