मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  एकनाथ शिंदे अजूनही शिवसेनेच्या नेतेपदी; कारवाई का नाही? चर्चेला उधाण

एकनाथ शिंदे अजूनही शिवसेनेच्या नेतेपदी; कारवाई का नाही? चर्चेला उधाण

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jun 25, 2022 05:46 PM IST

Shiv Sena Vs Eknath Shinde: शिवसेनेचे अर्ध्याहून अधिक आमदार फोडणारे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न शिवसेनेतून उपस्थित होत आहे.

Eknath Shinde - Ramdas Kadam
Eknath Shinde - Ramdas Kadam

Shiv Sena Vs Eknath Shinde: मुंबईत शिवसेना भवनात झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांवर जोरदार तोफ डागली. याच बैठकीत बंडखोरांवर कारवाई करण्याचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. मात्र, बंडखोरांचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे व कार्यकारिणीला दांडी मारणारे रामदास कदम यांच्यावर कारवाईची कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळं आश्चर्य व्यक्त होत आहे.

शिवसेनेतील बंडाळीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली होती. या कार्यकारिणीच्या बैठकीला अर्थातच एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले रामदास कदम हेही बैठकीला नव्हते. रामदास कदम यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम हे देखील शिंदे यांच्या बंडात सहभागी झाले आहेत. त्यामुळं शिंदे व कदम यांच्यावर कारवाईची घोषणा होईल. त्यांची नेते पदावरून हकालपट्टी केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, तशी कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.

खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले, ‘बंडखोरांवर कारवाई करण्याचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहेत. संध्याकाळपर्यंत बंडखोरांवर कारवाई झालेली दिसेल.’

शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांना याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या, ‘बंडखोरांवर कारवाई निश्चितच होईल. मात्र, घाईगडबडीनं काहीही केलं जाणार नाही. कोणतीही कायदेशीर वा तांत्रिक त्रुटी राहणार नाही याची काळजी घेतली जात आहे. ते सगळं पाहूनच ही कारवाई होईल.’

एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या नेते पदी आहेत. तसंच, ते राज्य सरकारमध्ये नगरविकास खात्याचे मंत्रीही आहेत. त्यांना मंत्रिपदावरून काढण्याचा अधिकार मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना असला तरी सध्याच्या परिस्थितीत कायदेशीर सल्ला घेतल्याशिवाय कोणतंही पाऊल उचलणं अडचणीचं ठरू शकतं. याची जाणीव असल्यानं आज कोणतीही घोषणा झालेली नाही, असं सांगितलं जात आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या