कोश्यारी राज्यपाल पदी राहिले तर महाराष्ट्र बंद करावा लागेल; उद्धव ठाकरेंचा केंद्राला इशारा
Uddhav Thackeray: शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राबाहेर हाकला अन्यथा तीव्र आंदोलन करावं लागेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
Uddhav Thackeray Warns Central Government: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळं निर्माण झालेला वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. 'भगतसिंह कोश्यारी यांचं सॅम्पल महाराष्ट्राबाहेर गेलं नाही तर महामोर्चा किंवा बंद सारखं आंदोलन करावं लागेल, असा थेट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य व केंद्र सरकारला दिला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मुंबईत ते पत्रकार परिषद बोलत होते. महाराष्ट्रातील पुरुषांबद्दल सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भगतसिंह कोश्यारी यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी यावेळी घणाघात केला. ‘केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या विचारसरणीची माणसं देशातल्या विविध राज्यांत राज्यपाल म्हणून पाठवली जातात. त्याची कुवत आणि पात्रता काय असते? ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही अशांना राज्यपाल नेमलं जातं का?,’ असा सवाल त्यांनी कोश्यारींचं नाव न घेता केला.
‘राज्यपालपदाची झूल अंगावर आली की काहीही बोललं तरी चालतं असं कोणाला वाटत असेल तर ते महाराष्ट्र मान्य करणार नाही. कोश्यारींना राज्यपाल म्हणणंच मी सोडून दिलंय. पण, ते केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या विचारसरणीचे असल्यानं त्यांची वक्तव्यं गांभीर्यानं घ्यावी लागतात. याच कोश्यारींनी काही दिवसांपूर्वी मुंबई व ठाण्याचा अपमान केला होता. त्यांना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची वेळ आली आहे असं मी तेव्हाच म्हटलं होतं. पण ते थांबत नसल्याचं दिसतंय. त्यांनी आता आमच्या दैवतावर बोलण्याची हिंमत केलीय. हे केवळ त्यांच्या काळ्या टोपीतून आलेलं नाही. त्या टोपीमागचा सडका मेंदू कोणाचा आहे याचा शोध घेण्याची वेळ आली आहे,’ असं सूचक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.
‘महाराष्ट्राच्या आदर्शांचा सातत्यानं अपमान करायचा आणि महाराष्ट्राच्या रक्तात भिनलेले आदर्श पुसून त्यांच्या भाकड नेतेमंडळींचा आदर्श लोकांच्या मनावर बिंबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचा निषेध आम्ही याआधीच केलाच आहे. शरद पवार, उदयनराजे, संभाजीराजे हे सगळेही बोलले आहेत. त्यामुळं आता या राज्यपालांना हटवलं गेलं नाही तर सर्व महाराष्ट्रप्रेमींनी एकत्र येण्याची गरज आहे. महाराष्ट्रद्रोह्यांना इंगा दाखवलाच पाहिजे. आम्ही दोन-तीन दिवस वाट पाहू. त्यानंतर महाराष्ट्र बंद करायचा की मोर्चा काढायचा हे ठरवू. त्यासाठी सर्वांनी एकत्र यावं,' असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ‘इतर कोणी आलं नाही तरी शिवसेना आपल्या पद्धतीनं महाराष्ट्रद्रोह्यांना उत्तर देणारच आहे,’ असंही त्यांनी ठणकावलं.
विभाग