मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Shirsath : फक्त ४८ जागा लढवायला आम्ही मूर्ख आहोत का?, शिंदे गटाचा भाजपवर पलटवार

Sanjay Shirsath : फक्त ४८ जागा लढवायला आम्ही मूर्ख आहोत का?, शिंदे गटाचा भाजपवर पलटवार

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 18, 2023 04:07 PM IST

Shinde Group vs BJP : विधानसभा निवडणुकीत भाजप २४० आणि शिंदे गट ४८ जागा लढवणार असल्याचं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं होतं.

Sanjay Shirsath On Chandrashekhar Bawankule
Sanjay Shirsath On Chandrashekhar Bawankule (HT)

Sanjay Shirsath On Chandrashekhar Bawankule : महाविकास आघाडीनं लोकसभेच्या निवडणुकीसाठी जागावाटपाचा सूत्र ठरवल्यानंतर आता सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटात यावरून राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप २४० आणि शिंदे गट ४८ जागा लढवणार असल्याचं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आहे. त्यानंतर आता त्यांच्या वक्तव्याविरोधात शिंदे गटाच्या आमदारांनी संताप व्यक्त केला आहे. विधानसभेला फक्त ४८ जागा लढवण्यासाठी आम्ही मूर्ख आहोत का?, असा संतप्त सवाल शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळं आता जागावाटपावरून भाजप आणि शिंदे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगण्याची शक्यता आहे.

माध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट बोलताना म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे यांनी अतिउत्साहात ते वक्तव्य केलं आहे. अशा वक्तव्यामुळं युतीत बेबनाव येऊ शकतो, याची जाणीव बावनकुळेंनी ठेवायला हवी. आम्ही फक्त ४८ जागा लढवायला मूर्ख आहोत का?, जागावाटपासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक होईल. त्यात जो निर्णय होईल तो सर्वांनाच मानावा लागेल. जागावाटपाबाबत बोलण्याचा अधिकार बावनकुळेंनी कुणी दिलाय?, अशा वक्तव्यांमुळं कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल होत असल्याचं सांगत संजय शिरसाट यांनी बावनकुळेंवर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले होते बावनकुळे?

कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते की, आगामी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा २४० जागा लढवणार आहे. शिंदे गटाकडे नेतेच नसल्यामुळं त्यांना आम्ही ५० जागा देणार आहोत. त्यानंतर वक्तव्याचा विपर्यास केल्याचं सांगत बावनकुळेंनी सारवासारव केली होती. त्यामुळं आता जागावाटपावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये राजकीय राडा रंगण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point