मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ramdas Kadam : उद्धव ठाकरे तुम्ही वडिलांच्या विचारांशी बेईमानी का केली?, रामदास कदमांचा सवाल

Ramdas Kadam : उद्धव ठाकरे तुम्ही वडिलांच्या विचारांशी बेईमानी का केली?, रामदास कदमांचा सवाल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 19, 2023 07:36 PM IST

Ramdas Kadam : अनिल परब यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी आम्हाला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला आहे.

Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam On Uddhav Thackeray (HT)

Ramdas Kadam On Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी आज शिंदे गटानं रत्नागिरीच्या खेडमधील गोळीबार मैदानावर सभा घेतली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत, दीपक केसरकर आणि योगेश कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यानंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी देखील उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. अनिल परब यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

खेडमधील सभेत बोलताना शिंदे गटाचे नेते रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांनी आमच्या सभेत किती गर्दी आहे, हे लपून का होईना पाहायला हवं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसऱ्याच्या सभेला लाखो लोक होती. त्यामुळं शिवसेना कुणाची हे त्याच दिवशी ठरलं होतं. २००९ साली मी दापोलीतून तिकीट मागितलं पण गुहागरमधून तिकीट देण्यात आलं. उद्धव ठाकरेंनी मला तिथं धोका देऊन, गाफील ठेवून पराभूत केल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. मातोश्रीसाठी आम्ही अनेक लोकांना अंगावर घेतलं. त्यामुळं आम्ही तुमचे काय घोडे मारलेत?, याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायला हवं. असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

कोकणातील नेत्यांना बाजूला सारून अनिल परब यांना रत्नागिरी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं. परब यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे २० आमदार सूरतला गेले. त्यावेळी गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीची साथ सोडण्यास सांगितलं. परंतु त्यांनी गुलाबरावांना मातोश्रीवरून हाकलून लावल्याचा आरोपही रामदास कदमांनी केला आहे. भास्कर जाधवांसारखे गद्दार आणि बेईमान लोकांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आमच्यावर चाल करून येत असल्याचा आरोपही कदमांनी केला आहे.

आमच्यावर खोके घेतल्याचा आरोप केला जातो. परंतु आम्ही देखील उद्धव ठाकरेंना पेढ्यांचे खोके दिले होते. ठाकरे गटानं आम्हाला जास्त सांगायला लावू नये. लंडन, श्रीलंका, सिंगापूर आणि अनेक देशांमध्ये कुणाची संपत्ती आणि कुणाच्या हॉटेल्स आहेत, हे योग्यवेळी जाहीर करणार असल्याचं रामदास कदमांनी म्हटलं आहे.

IPL_Entry_Point