मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  “उद्धव ठाकरे मोदींच्या भेटीनंतरच मुख्यमंत्रिपदाचा देणार होते राजीनामा, पण..”

“उद्धव ठाकरे मोदींच्या भेटीनंतरच मुख्यमंत्रिपदाचा देणार होते राजीनामा, पण..”

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 05, 2022 06:24 PM IST

उद्धव ठाकरे आणि मोदींची दिल्लीत भेट झाली होती. या भेटीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार होते, मात्र नारायण राणे यांना केंद्रात मंत्री बनवण्यात आल्याने उद्धव ठाकरे नाराज झाले आणि याबाबतची बोलणी थांबली, असा दावा दीपक केसरकर यांनी केला आहे.

ठाकरे-मोदी भेट
ठाकरे-मोदी भेट

मुंबई - शिवसेनेत झालेल्या बंडानंतर बंडखोर शिंदेगटातील नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी एक सनसनाटी गौप्यस्फोट केला आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर नारायण राणेंनी सुरू केलेल्या बदनामीविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींना कल्पना दिली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि मोदींची दिल्लीत भेट झाली होती. या भेटीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार होते, मात्र नारायण राणे यांना केंद्रात मंत्री बनवण्यात आल्याने उद्धव ठाकरे नाराज झाले आणि याबाबतची बोलणी थांबली, असा दावा दीपक केसरकर यांनी केला आहे. 

शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत मोठे खुलासे केले आहेत. या पत्रकार परिषदेत केसरकरांनी नारायण राणे यांचाही समाचार घेतला. सुशांतसिंह प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी केली गेली. यात नारायण राणेंसह त्यांच्या दोन्ही पुत्रांचाही सहभाग होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर ही वस्तुस्थिती घालून राणे काय बोलतायत हे सांगण्यात आलं होतं. त्यांनीही प्रतिसाद दिला. त्यानंतर मोदी व ठाकरे यांच्यात संवाद सुरू झाला. नंतर त्यांची भेट झाली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार होते. परंतु त्यानंतर १२ आमदारांचे निलंबन झाले आणि  राणेंना केंद्रात मंत्रिपद दिले गेले. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले होते. ही गोष्ट दोन-तीन लोकांना माहिती होती. त्यात रश्मी ठाकरेही होत्या, असं म्हणत केसरकरांनी मोठा खुलासा केला आहे.

एकनाथ शिंदेंना बाजूला ठेवा, आपण एकत्र येऊ, असंही उद्धव ठाकरेंनी भाजपच्या वरिष्ठ नेत्याला सांगितले होते. पण याला भाजप तयार नव्हता, असं म्हणत केसरकरांनी उद्धव ठाकरेंना अडचणीत आणलं आहे.

IPL_Entry_Point