sports university in waluj chhatrapati sambhajinagar : शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर करण्यात आला आहे. त्यात शेतकऱ्यांसह महिला आणि इतर समाजघटकांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. परंतु आता मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध औद्योगिक वसाहत असलेल्या वाळूज महानगरात राज्यातील दुसरं क्रीडा विद्यापीठाच्या उभारणीसाठी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळं आता येत्या काही दिवसांतच वाळूजमधील क्रीडा विद्यापीठाचं काम प्रत्यक्षात सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज येथे आम्ही क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यावर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळं आता थेट अर्थसंकल्पातून मराठवाड्यासाठी क्रीडा विद्यापीठाची घोषणा झाल्यामुळं छत्रपती संभाजीनगरच्या विकासात मोठी भर पडणार आहे. याशिवाय मराठवाड्याच्या ग्रामीण भागांसह शहरी भागातील तरुणांना क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करण्यासाठी नवा प्लॅटफॉर्म निर्माण होणार असल्यामुळं या निर्णयाबद्दल क्रीडाप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.
दोन वर्षांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारनं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये क्रीडा विद्यापीठ उभारण्याची घोषणा केली होती. परंतु तात्कालीन महाविकास आघाडी सरकारनं प्रस्तावित क्रीडा विद्यापीठ ऐनवेळी छत्रपती संभाजीनगर ऐवजी पुण्यातील बालेवाडीत हलवलं होतं. त्यावरून मोठं राजकीय वादंग पेटलं होतं. मराठवाड्यातील नेत्यांनी या प्रकरणासाठी तात्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. परंतु आता छत्रपती संभाजीनगरमध्ये नवं क्रीडा विद्यापीठ स्थापन केलं जाणार असल्यामुळं क्रीडाप्रेमींमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे.
संबंधित बातम्या