Santosh Deshmukh Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला अद्याप अटक न झाल्याने सर्वपक्षीय नेत्यांनी बीडमध्ये मूकमोर्चा काढला. या मोर्चात सहभागी झालेल्या छत्रपती संभाजीराजे यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. वाल्मिक कराड कुठे आहेत, हे धनंजय मुंडेना माहिती नसणे न पटणारे आहे. स्वत: पंकजा मुंडे यांनी एका सभेत वााल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडे यांचा पान हालत नसल्याचे वक्तव्य केले होते, असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला १९ दिवस झाले आहेत. मात्र, हत्येचा मुख्यसूत्रधार वाल्मिक कराड याला अद्यापही अटक झालेली नाही.त्यामुळे फरार आरोपीला अटक करण्याची मागणी करत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ आज बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चोत सहभागी झालेले संभाजीराजे यांनी अनेक संतप्त सवाल उपस्थित केले.
पुढे संभाजीराजे म्हणाले की, ‘मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अंत्यत क्रूर पद्धतीने हत्या झाली. १९ दिवस झाले पण अजूनही आरोपींना अटक झालेली नाही. वाल्मिक कराडला संरक्षण देणाऱ्या तिथल्या मंत्र्याचा राजीनामा का घेतला नाही? त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी का झाली नाही? सरकारने एसआयटी नेमल्यानंतर पुढे काय झाले?' असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
'संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, यासाठी आज बीडमध्ये मोर्चा काढला जात आहे. या मोर्चाला जातीय वळण नाही, हा सर्वधर्मीय मोर्चा आहे. आम्ही देखील वाट पाहत आहोत की, राज्य सरकार काय कठोर भूमिका घेत आहे?', असेही छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले.
धनंजय मुंडेंना वाल्मिक कराड कुठे आहे? हे माहिती नसणे हे न पटणारे आहे', असे बोलत छत्रपती संभाजीराजे यांनी संशय व्यक्त केला. 'राजकीय पाठबळ असल्याशिवाय संरक्षण मिळत नाही. स्वत: पंकजा मुंडे यांनी एका सभेत सांगितले होते की, वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचे पानही हलत नाही. आज पंकजा मुंडे या देखील या घटनेबाबत जास्त बोलत नाहीत', असेही ते म्हणाले.
बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी मराठा समाजबांधवांनी शुक्रवारी मूक मोर्चा काढला. देशमुख यांची कन्या वैभवी आणि मुलगा विराज यांनीही आक्रोश मोर्चात सहभाग घेतला. या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, देशमुख यांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्यात यावी, गुन्हा दाखल होण्यास उशीर करणाऱ्या किंवा आरोपींना मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे,अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
संबंधित बातम्या