NCP Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला (ncp sharadchandra pawar) मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला पक्ष आणि निवडणूक चिन्ह म्हणून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला मान्यता दिली आहे.शरद पवार गटाची निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी झाली. यावेळी निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला पक्ष म्हणून मान्यता दिली. याचबरोबर कलम २९ B नुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यापुढे देणगी सुद्धा स्वीकारता येणार आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला आता वेगवेगळ्या स्वरूपात मिळणारी देणगी स्विकारता येणार आहे. याबाबत या गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद कोर्टात गेल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर काही निर्बंध आले होते.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला चांगले मतदान झाले. त्यानंतर पक्षानेही निवडणूक आयोगाकडे पक्षाचा दर्जा देण्याची विनंती केली होती. सर्व बाबी विचारात घेत आता आयोगाने पक्षाचा दर्जा दिला आहे. तसेच पक्षचिन्हही कायम केले आहे. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीला आता अधिकृतपणे निधी स्विकारता येणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या पक्षाबाबत दिल्लीत चार वेगवेगळ्या महत्वाच्या सुनावण्या पार पडल्या. शरद पवार यांच्याकडून पक्ष काढून घेण्यात आला, मात्र जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलं होतं. ते आता कायम करण्यात आले आहे. आम्हाला देणगी, चेक घेण्याचा अधिकार नव्हता, तसेच टॅक्स बेनिफिट मिळत नव्हतं. मात्र आता आमची विनंती आयोगाने मान्य केली आहे.
आज सकाळी सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ८ नेत्यांचे शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेले होते. पक्षाच्या मागणीवर सुनावणी घेताना निवडणूक आयोगाने प्रक्रियेनुसार सेक्शन २९ बी नुसार आणि २९ सी नुसार प्रतिनिधी कायदा १९५१ चा हवाला देत पक्षाला देणगी, निधी स्विकारण्यास मान्यता दिली.