Akhil Bhartiya marathi sahitya samelan delhi : १९५४ नंतर ७० वर्षांनी दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची निवड करण्यात आली आहे. संयोजक संजय नहार यांनी ज शरद पवार यांच्या नावाची घोषणा केली. सरहद संस्था आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्लीत पार पडणार आहे.
याआधी १९५४ साली ३७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत पार पडले होते. त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ तर संमेलनाध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते. त्या संमेलनाचे उद्घाटन तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. या संमेलनानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ मिळाले आणि १ मे १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मात्र महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एकदाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले नाही. त्यानंतर ७० वर्षांनी दिल्लीत यंदा पार पडणाऱ्या या साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपदी शरद पवार यांनी निवड करण्यात आली आहे.
नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर ७० वर्षांनी दिल्लीत सरहद संस्थेद्वारे संमेलन आयोजित केले जात आहे. यासाठी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, नितीन गडकरी यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे.
या पुढील कार्यक्रमांमध्ये आणि व्यवस्थांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नागरी उड्डयन मंत्री, मुरलीधर मोहोळ आणि विनोद तावडे यांचे सहकार्य घेतले जाईल.
दिल्ली ही देशाची राजकीय राजधानी असल्यामूळे येथे होणारे संमेलन सर्वसमावेशक व्हावे या भावनेतून या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अनुभवी, ज्येष्ठ व साहित्यरसिक व्यक्ती व्हावी असा संयोजक समितीने प्रयत्न केला त्यातून शरद पवार यांनी स्वागताध्यक्ष व्हावे अशी संस्थेने विनंती केली. आणि ती विनंती शरद पवारांनी मान्य केली. शरद पवार हे केवळ उत्तम वाचक अथवा साहित्यप्रेमी नसून, महाराष्ट्रातून सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळीशी प्रारंभापासून जोडले गेले आहे. त्यांनी औरंगाबाद (२००४), नाशिक (२००५), चिपळूण (२०१३) आणि सासवड (२०१४) येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले आहे.